ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सचा प्रस्ताव धुडकावत सुरक्षा ठेवीची रक्कम देयकातूनच घेण्याचा निर्णय एनईएसएलच्या बैठकीत घेण्यात आला. महापौर अनिल सोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एनईएसएलच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दर महिन्याला ६ कोटी रुपये ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स कंपनीला देण्यात येतात. सुरक्षा ठेवीसाठी पाच टक्के रक्कम देयकातून वजा करण्यात येते. ही पाच टक्के रक्कम देयकातून न वजा करता त्या ऐवजी बँक गॅरंटी देण्याचा प्रस्ताव ओसीडब्ल्यूने एनईएसएलला दिला होता. या प्रस्तावावर चर्चा झाली. कराराप्रमाणे पाच टक्के रक्कम घेणे आवश्यक असल्याचे ‘कॅफो’ने सांगितले. बँक गॅरंटी करार बाह्य़ असल्याने ओसीडब्ल्यूचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे जलप्रदाय समितीचे सभापती सुधाकर कोहळे यांनी सांगितले. करार करताना कंपनीला एकूण खर्चाच्या पाच टक्के रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा करावी लागत. ओसीडब्ल्यूने ती केली नसल्याने दर महिन्याला ही वसूल करण्यात येत असल्याच्या प्रश्नावर कराराची माहिती घेऊन सांगतो, असेही कोहळे म्हणाले. एनईएसएलचे कार्यालय पेंच प्रकल्प गोरेवाडा व महापालिकेच्या मुख्य कार्यालयात राहणार आहे.
शासकीय व डीपीसीच्या कामासाठी निविदांना मंजुरी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. नव्याने नागपूर शहरात समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर आणि नरसाळा या भागात पाणी पुरवठा महापालिका करणार आहे. त्याचे कार्यालय म्हाळगीनगरमध्ये राहणार आहे.
ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सला काम देऊन दीड वर्षांचा कार्यकाळ झाला मात्र शहरात अजूनही समान पाणी वाटप होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येऊन त्यांना समान वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याप्रमाणे पेंच प्रकल्पाच्या संथ गतीच्या कामावरही नाराजी व्यक्त केली. लवकरात लवकर ही कामे करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले. या महिन्यात नंदनवन, बिनाकी आणि खरबी टाकीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. २४ बाय ७ योजनेचे काम सुरू असून मोठय़ा प्रमाणात खोदकाम केले जात आहे. अनेक तक्रारी आणि नोटीस बजावल्यानंतरही त्यांच्याकडून काम होत नाही. त्यामुळे महापालिका खड्डे बुजविणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. दोन झोन मिळून एक निविदा प्रमाणे पाच कंत्राटदारांना हे काम देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सर्व कंत्राटदारांनी निविदेत १९ लाख ८९ हजार १२७ रुपये एक सारखी रक्कम भरल्याने त्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे शंका व्यक्त करण्यात येत आहे. वर्षभरात काम केल्यावर ही रक्कम कंत्राटदारांना देण्यात येणार असून ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सकडून ती वसूल करण्यात येणार असल्याचे कोहळे यांनी सांगितले. पाण्याच्या जनजागृतीवर ४ कोटी ११ लाख खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय प्रसारासाठी ५८.३३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात
आली आहे.

 

Story img Loader