जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती मंगाराणी अंबुलगेकर यांनी जिल्हा परिषद पाळज गटातून निवडणूक लढवताना नामनिर्देशनपत्रासोबत जोडलेल्या शपथपत्रात मुलाच्या नावे असलेली मालमत्ता लपवली. तसेच शहरी व ग्रामीण भागात दोन ठिकाणी मतदारयादीत नावे ठेवून निवडणूक लढविल्याबाबत प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या उमेदवार सविता मलदोडे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी पुराव्यानिशी केलेल्या तक्रारीची आयोगाने गंभीर दखल घेतली. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी भोकरच्या उपविभागीय अधिकारी यांना दिल्या. या आदेशामुळे खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षी २० जानेवारी रोजी जिल्हा परिषद पाळज गटातून महिला राखीव असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडणूक लढवताना अंबुलगेकर यांनी नामनिर्देशपत्रासोबत दिलेल्या शपथपत्रात स्वत:, पती, मुले निखील व नितीन यांच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्तेचा तपशील दिला होता. परंतु मुलगा नितीनच्या नावे असलेली किनवट तालुक्यातील अंबाडी येथील ९ हेक्टर १८ आर, आसदवन नांदेड येथील ३.३५ चौमी, कौठा नांदेड येथील सामयिक कार्यक्षेत्र असलेली ५२.५० व वजिराबाद नांदेड येथील ६.५४ आदी ठिकाणची स्थावर मालमत्ता जाणूनबुजून लपवून ठेवल्याची बाब उघड झाली.
तसेच त्यांनी स्वत: भोकर तालुक्यातील पाळज येथे अनुक्रमांक ११७६वर ज्याचा ओळखपत्र क्रमांक एक्सएक्सके २०५३१४४८ व नांदेड महापालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदारयादीतील अनुक्रमांक १०२६वर (ईपीआयसी क्रमांक एचएलएस ०५८३४७६) असा असताना त्यांनी निवडणूक लढविली. सविता मलदोडे यांनी २७ डिसेंबर २०१२ रोजी लेखी पुराव्यानिशी राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने गेल्या ८ एप्रिलला जिल्हा परिषद निवडणुकीत मंगाराणी अंबुलगेकर यांनी निवडणुकीच्या वेळी नामनिर्देशनपत्रासोबत चुकीची व खोटी माहिती दाखल केली व त्यांनी दोन मतदारसंघांत नावे समाविष्ट असल्याने त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, असे जिल्हाधिकारी यांना कळविले. जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना तक्रारीच्या अनुषंगाने कागदपत्रांची चौकशी करून कारवाईच्या सूचना दिल्या. अंबुलगेकर यांच्यावर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.