आगामी गणेशोत्सवात न्यायालयाचे निर्देश आणि कायदा-सुव्यवस्था याला बाधा आणणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आज इचलकरंजीत प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी दिले. संबंधित पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झालेल्यांचे हद्दपारीचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे सूचना करुनही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नव्हता.
इचलकरंजीत गणेश मंडळांसाठी नगरपालिकेच्या जुन्या इमारतीतील सभागृहात तीन व चार सप्टेंबर सर्व परवाने एकाच छताखाली देण्यासाठी स्वतंत्र कॅम्प भरविण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.  गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी सोमवारी शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील पोलिस ठाणी व महसूल अधिकाऱ्यांची बठक आयोजित केली होती. या बठकीला तहसीलदार गुरु बिराजदार, मुख्याधिकारी सुनील पवार, जयसिंगपूरचे पोलिस उपाधीक्षक दिलीप कदम आणि गावभाग, शिवाजीनगर, हुपरी, कुरुंदवाड, जयसिंगपूर, शिरोळ, वडगांव, हातकणंगले व शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित अधिकाऱ्यांकडून प्रांताधिकारी जिरंगे यांनी सूचना ऐकून घेतल्या. सणासुदीच्या काळात राबविण्यात येणारी यंत्रणा, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांसमोर मांडल्या. प्रांताधिकारी जिरंगे यांनी सूचना देताना हुपरी येथील गतसालातील घटना पाहता मोठय़ा गणेशमूर्ती नेताना संबंधित विभागातील वीज बंद करावी, गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरुपाची वीज उपलब्ध करुन द्यावी, तसेच संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यानी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या समाजकंटकांवर कडक कारवाई करताना त्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत, गणेश मंडळांच्या आरतींना जाताना अधिकाऱ्यांनी संबंधित मंडळांची पाश्र्वभूमी तपासून पाहावी आदी सूचना केल्या. ज्या समाजकंटकांवर हद्दपारीची कारवाई होईल ते कार्यक्षेत्रात फिरकणार नाहीत हे पाहण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करावी आणि पालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरुन घ्यावेत, वाहतूक पोलिसांनीही उत्सव काळात सर्वसामान्यांना त्रास होणार नाही अशा पध्दतीने वाहतुकीचे नियोजन करावे अशा महत्त्वपूर्ण सूचनाही या वेळी करण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा