दक्षिण महाराष्ट्रात ‘चि.सौ.कां.’च्या होत असलेल्या बाजाराची गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भात काही लोकप्रतिनिधींनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला असून माहिती संकलनासाठी सांगली पोलिसांची धावपळ सुरू आहे. याबाबत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज तपासाचे आदेश दिले आहेत. दरम्यान कर्नाटकातील हवेरी, हुबळी जिल्ह्यातील ४० ते ५० तरुण मुली बेपत्ता असून त्यांच्या शोधासाठी  कर्नाटक पोलिसांनीही सांगली पोलिसांशी संपर्क साधला आहे.
सांगली पोलिसांनी मिरजेच्या लॉजवर छापा टाकून एका अल्पवयीन मुलीसह चौघांना ताब्यात घेतले होते. दलालासह तिघांच्याकडे चौकशी केली असता पोलिसांना काही मुलींची लग्नासाठी म्हणून विक्री करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यापकी सहा मुलींचा शोध पोलिसांना लागला आहे. अद्याप काही मुलींचा तपास लागलेला नाही.
या वृत्ताची कर्नाटक पोलिसांनीही गांभीर्याने दखल घेतली असून हवेरी व हुबळी जिल्ह्यातील बेपत्ता मुलींचा तपास नव्याने सुरु करण्यात आला आहे. हवेरी जिल्हा पोलिसांच्या पथकाने सोमवारी सांगली पोलिसांशी संपर्क साधून गायब मुलींच्याबाबत चौकशी केली. या दोन जिल्ह्यातील ४० ते ५० मुली अशा पद्धतीने  गायब झाल्या असाव्यात असा पोलिसांचा कयास आहे.
बेपत्ता मुलींच्या पालकांकडे कर्नाटक पोलिसांनी चौकशी केली असल्याचे समजते. मात्र, त्यांना मुली नेमक्या कोणत्या गावी आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र या मुलींच्या देवाण-घेवाणीत महत्त्वाचा सहभाग असणारे दलाल गायब झाले आहेत. त्यामुळे कर्नाटक पोलीसही मुलींच्या शोधास असमर्थ आहेत.
मुलींची खरेदी-विक्री होत असलेल्या वृत्ताची गांभीर्याने दखल घेऊन आ. प्रकाश शेंडगे, आ. संभाजी पवार आदींनी या संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगली पोलिसांना तत्काळ माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.

Story img Loader