सत्तेची संधी बहुसंख्य कार्यकर्त्यांना मिळावी यासाठी जिल्हा परिषदेतील अध्यक्षांसह सर्वच पदाधिकाऱ्यांना दोन दिवसांत राजीनामा देण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विलासराव िशदे यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाचे संकेत मिळताच इच्छुकांनी जोरदार मोच्रेबांधणी सुरू केली असून वाळवा तालुक्यातील देवराज पाटील आणि मिरज तालुक्यातील भीमराव माने यांनी अध्यक्षपदासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली आहे. पदाधिकारी निवडीच्या वेळी वेगवेगळय़ा कार्यकर्त्यांना एक वर्ष मुदतीसाठी पद देण्याचा निर्णय झाला होता. दुष्काळी भागाला संधी द्यायची म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आटपाडीचे अमरसिंह देशमुख यांना अध्यक्षपदाच्या रूपाने लाल दिवा दिला. एक वर्षांची मुदत संपताच इच्छुकांनी पदाधिकारी बदलाची मागणी सुरू केली होती.
सदस्यांची पदाधिकारी बदलाची मागणी लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष िशदे यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात सर्व सदस्यांची बठक घेतली. या बठकीत पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. या बठकीस अध्यक्ष देशमुख यांच्यासह बांधकाम सभापती देवराज पाटील, कृषी समितीचे सभापती अप्पासाहेब हुळ्ळे यांच्यासह बहुसंख्य सदस्य हजर होते.
समिती सभापतींनी येत्या दोन दिवसांत आपले राजीनामे अध्यक्षांकडे सुपूर्द करायचे आहेत. त्यानंतर अध्यक्ष विविध समित्यांच्या सभापतींचे आणि उपाध्यक्षांचा राजीनामा मंजूर करुन आपला राजीनामा विभागीय आयुक्तांना सादर करतील. त्यानंतर नवीन पदाधिकारी निवडीसाठी विभागीय आयुक्त कार्यक्रम जाहीर करतील.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची जनसुराज्य पक्षाशी युती असून उपाध्यक्षपद या पक्षाचे बसवराज पाटील यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या बठकीस पाटील अनुपस्थित होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची जबाबदारी पक्षाचे नेते विलासराव जगताप यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाचा पक्षाने निर्णय जाहीर करताच इच्छुकांनी मोच्रेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले असल्याने अनेकजण इच्छुक असले तरी देवराज पाटील आणि भीमराव माने यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. देवराज पाटील हे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचे पुतणे असून सध्या बांधकाम समितीचे सभापती म्हणून कार्यरत आहेत.
नवीन पदाधिकारी निवडताना ग्रामविकासमंत्री जयंत पाटील व गृहमंत्री आर. आर. पाटील हे सर्व सदस्यांची मते जाणून घेऊन योग्य कार्यकर्त्यांना संधी देतील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे यांनी सांगितले.