नौपाडा येथील चंद्रनगर परिसरातील बिल्डरने उभारलेली भिंत अनधिकृत असल्याचे शिक्कामोर्तब करत ती येत्या १५ दिवसात पाडण्याचे आदेश महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीने संबंधित बिल्डरला नुकतेच दिले आहेत. तसेच बांधकामधारकाने ही भिंत मुदतीमध्ये तोडली नाही तर महापालिका त्यावर कारवाई करेल आणि त्यासाठी येणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
चंद्रनगर भागातील चाळी विकसित करून त्या जागी तीन टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या असून त्यापैकी दोन इमारतीमध्ये चाळकऱ्यांना राहण्यासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, तर तिसरी इमारत विक्रीसाठी उभारण्यात आली असून या इमारतीशेजारीच उद्यान तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मात्र, चाळकरी राहत असलेल्या दोन्ही इमारतींच्या जवळून तिसऱ्या इमारतीकडे जाण्यासाठी असलेल्या मार्ग बिल्डरने भिंत बांधून बंद केला आहे. त्यामुळे या दोन्ही इमारतींमधील रहिवाशांना उद्यान तसेच अन्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या संदर्भात, रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रार केली होती.
त्यानुसार, महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त स्वाती देशपांडे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यामध्ये बिल्डरने उभारलेली भिंत अनधिकृत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
येत्या १५ दिवसात ही भिंत पाडण्याचे आदेश त्यांनी संबंधित बिल्डरला दिले आहेत. तसेच बांधकामधारकाने ही भिंत मुदतीमध्ये तोडली नाही तर महापालिका त्यावर कारवाई करेल आणि त्यासाठी येणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.