आरोग्य खात्यात रिक्त असलेली आरोग्य सेवकांची (गट-क) १२०० रिक्त पदे भरण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिवांनी आरोग्य विभागाच्या संचालक आणि सहसंचालकांना दिले आहेत. यामुळे ग्रामीण भागात आणखी सक्षमपणे आरोग्य सेवा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
संपूर्ण राज्यभरात आरोग्य सेवकांची एकूण १६९९ पदे रिक्त होती. सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने ही पदे भरण्यास मान्यता दिली होती. सेवा प्रवेश नियमानुसार १० टक्के पदे पदोन्नतीने, ४० टक्के पदे खुल्या उमेदवारांमधून आणि ५० टक्के पदे हंगामी फवारणी कर्मचाऱ्यातून भरली जातात. २०१३ मध्ये ४० टक्के पदे खुल्या उमेदवारांमधून भरण्यात आली. परंतु हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून भरण्यात येणारी ५० टक्के आरोग्य सेवकाची पदे भरण्यात आली नव्हती. ही पदे भरण्यासाठी सेवा प्रवेश नियम सुधारित करण्याची कार्यवाही सुरू होती.
आरोग्य सेवक (पुरुष) गट- क पदाचे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्यात आले असून त्याबाबतची अधिसूचना ६ जूनला काढण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार ही १२०० रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवावी, असे आदेश आरोग्य खात्याच्या उपसचिवांनी संचालक आणि सहसंचालकांना (हिवताप, हत्तीरोग) दिले आहेत.
या निर्णयाचे कास्ट्राईब आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष प्रवीण मंडपे, कार्याध्यक्ष पंकज उलीपवार, पंकज घाटे, अजय शेवाळे, मधुकर तिखे, देवानंद वरघणे यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order to appoint 1200 health servants