शहरातील औद्योगिक क्षेत्रातील जलवाहिन्या जुन्या झाल्या असून त्या बदलण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एस. बी. पाटील यांनी संबंधितांना दिले.
नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (निमा) पदाधिकाऱ्यांची पाटील यांनी भेट घेतली असता नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्न व समस्यांची माहिती निमाच्या शिष्टमंडळाने त्यांना दिली. दीड एफएसआयची सविस्तर माहिती, औद्योगिक क्षेत्राबाहेरील उद्योगांना पाणी पुरवठा करणे, अंबड येथील अग्निशमन केंद्राचा प्रस्ताव आठ दिवसात पाठविणे यांसह औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांविषयी असलेले प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. निमा हाऊस येथे झालेल्या बैठकीस पाटील यांसह कार्यकारी अभियंता प्रकाश लोणकर, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष मनिष कोठारी, खजिनदार प्रदीप बुब, शैलेश नारखेडे, राजेंद्र वडनेरे, मिलींद राजपूत आदी उपस्थित होते.
बेळे यांनी नाशिक औद्योगिक क्षेत्रात सीईटीपीची मागणी जुनी असून त्याबाबत बैठका झाल्या, पत्रव्यवहार झाल्याची जाणीव करून दिली. या प्रकरणात त्वरीत कार्यवाही व्हावी, औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या भूखंडांना तारेचे कुंपण करणे, दुष्काळाची परिस्थिती बघता उद्योगांना कुपनलिका करण्यास परवानगी देणे, औद्योगिक क्षेत्राबाहेरील उद्योगांना पाण्याची जोडणी देणे, अंबड येथे अग्निशमन केंद्राची उभारणी, औद्योगिक क्षेत्रातील जलवाहिन्या जुन्या झाल्याने त्यामधून गळती होते. या जलवहिन्या बदलणे आवश्यक आहे. सिन्नर औद्योगिक क्षेत्रात नवीन भूखंडांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, नवीन औद्योगिक धोरणात दीड एफएसआयची परवानगी देण्यात आली असली तरी त्याबाबतच्या नियमांची माहिती सविस्तर नाही. त्यासाठी मार्गदर्शन करावे.
तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगांना बांधकाम पूर्ण करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०१३ पर्यंत मुदतवाढ दिली असून त्यानंतर बांधकामासाठी मुदतवाढ मागणाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे. याविषयी स्पष्ट माहिती मिळत नसून संभ्रम निर्माण होत असल्याचे बेळे यांनी यावेळी पाटील यांच्या लक्षात आणून दिले. यावेळी निमाचे उपाध्यक्ष मनिष कोठारी, समीर पटवा, मिलींद राजपूत यांनीही प्रश्न मांडले.

Story img Loader