निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थी अनुपस्थित असणाऱ्या जिल्हय़ातील ३३१ प्राथमिक शाळांची तपासणी करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
जिल्हय़ात गतवर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या पुढाकाराने पटपडताळणी करण्यात आली. या पटपडताळणी दरम्यान शिक्षण क्षेत्रातील धक्कादायक अनागोंदी समोर आली. पटपडताळणीचा हा नांदेड पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्यात आल्यानंतर सर्व जिल्हय़ांत कमी-अधिक प्रमाणात मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचे उघड झाले होते. बनावट विद्यार्थी संख्या दाखवून तुकडय़ा मिळविणे, शाळा मिळविणे व शिक्षकांची भरती करून लाखो रुपये कमविणे असा गोरखधंदा काही संस्थाचालकांनी सुरू केला होता.
गतवर्षीच्या पटपडताळणीनंतर यंदा अनेक शाळांनी सुधारणा केली. काही शाळांची विद्यार्थी संख्याही लक्षणीय वाढली. गुणवत्तेबाबतही शिक्षक चांगले प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले. पटपडताळणीनंतर कारवाई टाळण्यासाठी अनेक संस्थाचालक, शिक्षक संघटना व काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सध्या ही सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. अजून कोणावरही कारवाई झाली नाही. असे असले तरी ज्या शाळांची अनुपस्थिती ५० टक्क्यांपेक्षा अधिक होती अशा ३३१ शाळांची तपासणी करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शिक्षण संचालकांच्या आदेशावरून ही तपासणी होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हय़ात जिल्हा परिषदेच्या २२७३ तर खासगी शिक्षण संस्थांच्या ६७० शाळा आहेत. पैकी पहिल्या टप्प्यात ३३१ शाळांची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. तपासणीचा एक फॉर्म तयार केला आहे. बालहक्क कायद्यानुसार भौतिक सोयीसुविधा आहेत का, ग्रंथालय आहे का, इमारत आहे का, शौचालय उपलब्ध आहे का, विद्यार्थी संख्या किती व उपस्थितांचे प्रमाण कसे आहे यासह अनेक बाबींची तपासणी होत आहे. येत्या दोन दिवसांत तपासणी पूर्ण करून अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नांदेडातील ३३१ शाळांची तपासणी करण्याचा आदेश
निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थी अनुपस्थित असणाऱ्या जिल्हय़ातील ३३१ प्राथमिक शाळांची तपासणी करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. जिल्हय़ात गतवर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या पुढाकाराने पटपडताळणी करण्यात आली.
आणखी वाचा
First published on: 05-02-2013 at 02:23 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order to investigate of 331 schools in nanded