सुमारे साडेनऊ लाख रुपयांची अफरातफर करुन फसवणूक केल्याच्या आरोपावरुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडारचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळासह सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे व तत्कालीन प्रशासक किरण आव्हाड अशा एकूण १८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश सीआरपीसी कलम १५६ (३) नुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज तोफखाना पोलिसांना दिला आहे.
संस्थेचे अध्यक्ष शरद रच्चा, उपाध्यक्ष शरद क्यादर, संचालक व माजी आमदार दादा कळमकर, विजयसिंह परदेशी, हिरालाल भंडारी, प्रदिप बोरा, राजकुमार गांधी, वैभव लांडगे, अतुल भंडारी, अरविंद गुंदेचा, छाया फिरोदिया, आशा फिरोदिया, सुनंदा भालेराव, सुनिता सारसर, माजी व्यवस्थापक प्रकाश गांधी, विद्यमान व्यवस्थापक सुरेंद्र भंडारी, हौसारे व आव्हाड यांचा त्यात समावेश आहे.
यासंदर्भात संस्थेचे सभासद संजय शिवाजी डापसे यांनी वकील मनोज जायभाये यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यापूर्वीही डापसे यांच्या तक्रारीवरुन स्वतंत्र न्यायालयांच्या आदेशानुसार संस्थेच्या संचालक मंडळाविरुद्ध दोन गुन्हे तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
डापसे यांच्या तक्रारीत म्हटले की, १ डिसेंबर २०११ ते ५ मे २०१२ दरम्यान नगर शहरातील संस्थेच्या जुने दाणे डबरा येथील कार्यालयात हा प्रकार घडला. १ डिसेंबर २०११ पासून प्रकाश गांधी हे संस्थेच्या व्यवस्थापक पदावर नाहीत, तरीही त्यांनी वेळोवेळी संस्थेच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून संचालक मंडळाशी संगनमत करुन, बनावट कागदपत्रे तयार करुन ९ लाख ४७ हजारांची रक्कम धनादेशाद्वारे काढली, यासंदर्भात संचालक मंडळ, तत्कालीन प्रशासक व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार करुनही दखल घेतली गेली नाही व संबंधितांवर कारवाई केली नाही, तोफखाना पोलीस व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करुनही त्यांनीही दखल घेतली नाही, असे नमूद करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.