पंढरपूर तालुक्यातील अनवली येथे राहणारे उषा व तिचा पती सतीश यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाची काय कार्यवाही झाली आहे याबाबतचा अहवाल एक महिन्यात राष्ट्रीय महिला आयोगाकडे पाठवावा, असा आदेश राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या निर्मला सामंत प्रभावळकर यांनी दिला असून मृत उषाचे वडील ज्ञानेश्वर घोडके यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.
उषा जगताप हिचा मृत्यू २२ फेब्रुवारी ०५ रोजी तर सतीश जगताप याचा मृत्यू १३ मे ०५ रोजी संशयास्पदरीत्या झाला होता. हा मृत्यू नसून जावई व मुलगी हिचा खून करण्यात आला असा संशय व्यक्त करून मृत सतीश जगताप याचे सासरे ज्ञानेश्वर घोडके यांनी या घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून करावा अशी मागणी करून त्यासाठी लेखी निवेदन, उपोषण मार्ग अवलंबले होते.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा तपास अतिशय मंद असल्याने यातील जे दोषी आहेत ते उजळ माथ्याने फिरत आहेत, असा आरोप घोडके यांनी करून राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल राज्य महिला आयोगाने घेऊन या घटनेचा अहवाल ३० दिवसांच्या आत कार्यालयास कळवावा असे आदेश दिले. मृत मुलगी उषा व जावई सतीश यांचे खरे मारेकरी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण लढत राहणार, असे ज्ञानेश्वर घोडके यांनी सांगितले.