उरण तालुक्यातील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी मातीचे होत असलेले अनधिकृत उत्खनन थांबविण्याचे व ते करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
उरण तालुक्यातील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या द्रोणागिरी डोंगराला पौराणिक, ऐतिहासिक महत्त्व आहे. उरण करंजा येथील द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जमिनीचेही सपाटीकरण करण्यासाठी डोंगर पोखरला जात आहे. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्यांबरोबरच शेजारील गावालाही दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावावर डोंगर कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेप्रमाणे येथेही तशी घटना होऊ शकते अशी भीती येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. द्रोणागिरी डोंगराचे संरक्षण व्हावे या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी सह्य़ांची मोहीमही राबविली होती. त्या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. गेल्या सात ते आठ वर्षांपासून अनेक वेळा ही मागणी आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करीत आहोत, असे सुधाकर पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, या संदर्भात जिल्हा खनिकर्म अधिकारी, रायगड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार डोंगराचे अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, तर दुसरीकडे डोंगर परिसरातील उत्खननाची तहसील विभागाने पाहणी केली असून डोंगर परिसरात कोणत्याही प्रकारचे उत्खनन सुरू नसल्याची माहिती उरणचे नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांनी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जगदीश तांडेल, उरण
द्रोणागिरी डोंगराचे महत्त्व
द्रोणागिरी डोंगराचे पुराणकालीन महत्त्व असून रामायणात हनुमानाकडून लंकेत संजीवनीसाठी नेण्यात येणाऱ्या डोंगराचा भाग असल्याचे सांगितले जाते. तर डोंगराच्या उत्तरेकडील माथ्यावर एक पुराणकालीन किल्ला आहे. त्यामुळे हा डोंगर ऐतिहासिकदृष्टय़ाही महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे याच डोंगराच्या कुशीत देशाच्या उद्योगातील नवरत्नांपैकी एक असलेला व परकीय हल्ल्याच्या दृष्टीने सुरक्षेची गरज असलेला ओएनजीसीचा प्रकल्पही आहे. या प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या जळणाऱ्या वायूचे काळे ढग उरण शहर व तालुक्यात न येता उंचावर जात असल्याने त्याचा त्रास होत नाही. त्याचप्रमाणे द्रोणागिरी डोंगर हा समुद्रकिनारी असल्याने समुद्राच्या धोक्यापासूनही उरण तालुक्याचे संरक्षण होत आहे.