शासकीय वैद्यकीय महाविद्यालये ही शोभेची वस्तू न राहता रुग्णांना सर्व प्रकारच्या अद्ययावत सोयी उपलब्ध करून देणारी आरोग्यधाम झाली पाहिजेत. त्यासाठी या महाविद्यालयांना सर्वोत्तम दर्जाच्या सेवा देण्याचा प्रयत्न महाविद्यालयाच्या प्रशासनाने करावा, असे पोटतिडिकीचे आवाहन राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाचे मुख्य सचिव डॉ. आनंद कुळकर्णी यांनी येथे केले आहे.
या महाविद्यालयाला डॉ. कुळकर्णी यांनी सोमवारी भेट देऊन महाविद्यालयातील रुग्णसेवांचा आढावा घेतला. त्यासाठी आयोजित बठकीला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आनंद डोंगरे, अधीक्षक किशोर इंगोले, सर्व विभागाचे प्रमुख प्राध्यापक आणि डॉक्टर्स, कार्यकारी अभियंता दिलीप तिखिले इत्यादी हजर होते. १९८९ मध्ये स्थापन झालेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी १९८६ मध्ये न.मा. जोशी आणि नरेंद्र मोर यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व आंदोलन होऊन कधी नव्हे असा यवतमाळ बंदचे आंदोलन झाले होते. उल्लेखनीय म्हणजे, १२७ एकर जागेत ५ लाख १३ हजार ९६९ चौ.मि. भौगोलिक क्षेत्रात उभ्या असलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीत २८८ खाटांचे आणि जुन्या रुग्णालयाच्या इमारतीत २५२ खाटांची व्यवस्था आहे. १२ ऑपरेशन थिएटर असून जुने महिला रुग्णालय आणि क्षय रुग्णालय या महाविद्यालयाला जोडले आहे. महाविद्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या अद्ययावत प्रेक्षागृहात ८०० प्रेक्षक बसू शकतील, अशी व्यवस्था, महाविद्यालयाचे भव्य ग्रंथालय, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा, सिटी स्कॅन आणि एमआरआयची व्यवस्था, तसेच १०० विद्यार्थी क्षमतेचा एम.बी.बी.एस. पदवी अभ्यासक्रम आणि मर्यादित विद्यार्थी संख्येचे एम.डी., एम.एस असे पदव्युत्तर अभ्यासक्रम मुले, मुली आणि निवासी डॉक्टर यांच्यासाठी वसतिगृहे तसेच भव्य इमारती ही या महाविद्यालयाची वैशिष्टय़े आहेत.
परंतु, या महाविद्यालयात रुग्णांसाठी उपचारांच्या अद्ययावत सोयी नसल्याचे डॉ. आनंद कुळकर्णी यांच्या लक्षात आले तेव्हा अत्युत्तम दर्जाच्या सर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रकल्प महाविद्यालयाने हाती घेऊन तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा, असे आदेश दिले. या महाविद्यालयातील सिटी स्कॅन, एम.आर.आय, क्ष किरण इत्यादी यंत्रणा वारंवार निकामी होत असतात. त्या २४ तास कार्यरत असाव्यात, या मागणीसाठी सेना आमदार संजय राठोड यांनी अनेकदा बंद, घेराव अशी आंदोलने केली आहेत. दिवंगत जवाहरलाल दर्डा आरोग्यमंत्री असताना यांनी महाविद्यालयात सरकार जर निधी उपलब्ध करून देत नसेल तर महाविद्यालयाला दिलेले वसंतराव नाईकांचे नाव काढून टाका, असा दम सरकारला दिला होता तेव्हा कुठे महाविद्यालयाला आर्थिक सहाय्य करण्याचा गांभीर्याने विचार केला. विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनीसुध्दा या प्रश्नावरून अनेकदा सरकारची खरडपट्टी काढली आहे.
डॉ. भूषण गगराणी वैद्यकीय शिक्षण सचिव असताना त्यांनीसुद्धा महाविद्यालयाला भेट देऊन महाविद्यालयात अद्ययावत सेवा नसतील तर त्याचा उपयोगच काय, असा सवाल केला होता. महाविद्यालयातील रिक्त पदे तातडीने भरणे इमारतींच्या बांधकामाची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणे इत्यादी बाबतीत लक्ष देण्याचे आश्वासन डॉ. कुळकर्णी यांनी दिले. बठकीला डॉ. भारती, डॉ. जतकर, डॉ. मोरे, डॉ. राऊत, डॉ. बांगडे, डॉ. थोरात, डॉ. खाकसे, डॉ. गवाल्रे इत्यादी विभागप्रमुख हजर होते.
सर्पदंशाचे सर्वाधिक बळी
यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल आणि विमुक्त भटक्यांचा जिल्हा म्हणून मागासलेला जिल्हा असल्याने यवतमाळात प्राधान्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आले. या जिल्ह्य़ात अतिविषारी सापांचे साम्राज्य असून दरवर्षी सर्पदंशाचे सर्वाधिक बळी पडतात. शिवाय, कुत्र्याच्या चावण्याने सुद्धा जीव गमावण्याच्या घटना त्यादृष्टीने महाविद्यालयात आता या दोन्ही प्रकारच्या रुग्णांवर इलाज करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले.