कोणतीही कृत्रिम खते, अत्याधुनिक अवजारांचा वापर न करता निसर्गातील साधनांचा शेतीसाठी वापर करून बदलापूरमधील बेंडशीळ गावाजवळील ओसाड माळरानावर सेंद्रिय शेती फुलविणारे शेती संशोधक राजेंद्र श्रीकृष्ण भट यांना कृषीभूषण पुरस्काराचा मान मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे फुलवलेल्या या शेतीची शासनाच्या कृषी विभागाने दखल घेऊन राजेंद्र भट यांची कोकण विभागातून सेंद्रिय शेतीच्या ‘कृषीभूषण’ पुरस्कारासाठी निवड केली. दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते भट यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
विज्ञान शाखेतील शेतीची पदवी घेतल्यानंतर शेती क्षेत्रात काही नावीन्यपूर्ण करावे या उद्देशातून राजेंद्र भट यांनी बदलापूरजवळ बेंडशीळ गावाजवळ १९९० मध्ये पाच एकर ओसाड माळरान विकत घेतले. पाणी संचय, जमिनीची धूप थांबवणे, शेण खताचा प्रभावी वापर, पालापाचोळा, झाडांची मुळं, गांडूळ, ठिंबक सिंचन या नैसर्गिक साधनांचा वापर करून त्यांनी पाच एकर क्षेत्रात भातशेती, नारळ, आंबा, विविध प्रकारची हंगामी पिके घेण्यास सुरुवात केली. या लागवडीमधून बिनखताचा भाजीपाला, फळे, बियाणे उपलब्ध होऊ लागली. वेलवर्गीय, खुरटय़ा पिकांचा हंगाम संपल्यानंतर त्यांचाच पालापोचाळा, मूळ शेतीत कुजवून त्या ठिकाणी मसालेदार, सुगंधी, औषधी वनस्पती पिकांचे यशस्वी प्रयोग केले.
कीटकनाशकांचा वापर नाही. जमीन भुसभुशीत करण्यासाठी राब करून ती जाळायची नाही. त्याऐवजी गांडुळांचा मोठय़ा प्रमाणात वापर करून पाच एकर क्षेत्रात पाणी जिरवण्यात येत आहे. कोणत्याही कृत्रिमतेला, आधुनिक अवजाराला पाच एकर क्षेत्रात प्रवेश नाही. बहुस्तरीय बहुपिके घेऊन उत्पादन वाढविले जाते. विविध वनस्पती फुलांचे सुगंधी दरवळ, पक्षी, त्यांचा किलबिलाट, मधमाश्या, त्यांची पोळे ही साखळी या बागेच्या माध्यमातून तयार झाली आहे. आपण फक्त एक निमित्तमात्र त्या ठिकाणी आहोत, असे राजेंद्र भट यांनी सांगितले. शरीराचे आरोग्य सांभाळले तर शरीर सुदृढ राहते. त्याप्रमाणे निसर्गाचा समतोल सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सांभाळला तर पर्यावरणपूरक वातावरण तयार होते. शेतीची उत्पादकता वाढते. जागतिक उष्णतामान, प्रदूषण या सगळ्या अराजकसदृश परिस्थितीला निसर्गच परस्पर उत्तरे देत असतो. फक्त यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. या शेतीच्या माध्यमातून वर्षभरात प्रशिक्षणाचे उपक्रम राबवले जातात. अनेक शेतकरी, शासकीय अधिकारी, हौशी विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेतात. बाजारातील फळे-भाजीपाल्यांपेक्षा या शेती मालाला भले दोन पैसे कमी भाव मिळाला तरी सुदृढ आरोग्यासाठी या भाजी भावाचे मोल करता येत नाही, असे भट यांनी सांगितले.
शासनाकडूनच निवड
या पुरस्कारासाठी स्वत:हून अर्ज, शिफारस करण्याची पद्धत नाही. शासकीय कृषी अधिकारी तालुका, जिल्हा, विभाग स्तरावरून ही निवड करतात. कोकण विभागातून ठाणे जिल्ह्य़ातून सेंद्रिय शेती पुरस्कारासाठी झालेली आपली एकमेव निवड आहे, असे भट यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठीचे हे निसर्गातील कुटुंब सांभाळण्यासाठी सर्व भट कुटुंबीय एकत्रितपणे काम करतेय. भट यांचा मुलगाही शेतकी पदवीधर झाला आहे. त्यामुळे हा वारसा पुढेही चालू राहणार आहे. शेतीविषयक अन्य पुरस्कारांसाठी वाडय़ाचे अनिल पाटील, डहाणूचे विनायक बारी यांचीही निवड झाली आहे.