दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची जन्मशताब्दी आणि कराड तालुका खरेदी-विक्री संघाच्या अमृतमहोत्सवानिमित्त लवकरच सहकार परिषद व शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष हणमंतराव चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत दिली.
संघाचे उपाध्यक्ष महेशकुमार जाधव, सरव्यवस्थापक शशिकांत पाटील या पत्रकार परिषदेला  उपस्थित होते.
हणमंतराव चव्हाण म्हणाले, की संघाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व सर्वाच्या सहकार्यातून संघाची आर्थिक स्थिती भक्कम आहे. १६ नोव्हेंबर १९३७ रोजी कराड येथे त्या काळातील सातारा-सांगली जिल्ह्यातील सहकारातील धुरीणांनी या संघाची स्थापना दिली.
कृष्णराव पिराजी पाटील यांनी संघाचे पहिले अध्यक्षपद भूषविले. अमृतमहोत्सवानिमित्त संस्थापक, संचालकांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न आहे.
राज्यातील मोजक्या खरेदी-विक्री संघामध्ये कराड तालुका खरेदी-विक्री संघ अग्रेसर आहे. गत आर्थिक वर्षांत ७५ कोटींची झालेली उलाढाल यंदा १०० कोटीवर जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्य कार्यालयासह २५ शाखांच्या माध्यमातून संघ कार्यरत आहे. संघाला मार्चअखेर १ कोटी ८४ लाख इतका नफा झाला आहे.
कराड तालुका खरेदी-विक्री संघाच्या  अमृतमहोत्सव व यशवंतराव  चव्हाणसाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष, असा दुहेरी योग साधून पुढील महिन्यात आमदार उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार परिषद व शेतकरी मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती ही या पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

Story img Loader