नेपाळमध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर आता देशविदेशांतून तेथे मदतीचा ओघ सुरू झाला असला, तरी ही मदत प्रामुख्याने तेथील माणसांसाठी आहे. पण मुंबई, डोंबिवली आणि पुणे येथील तीन प्राणीमित्र संघटनांनी या अडचणीच्या वेळी नेपाळमध्ये धाव घेत तेथे ‘बेघर’ झालेल्या, जखमी झालेल्या प्राण्यांना मदत करण्याचे कर्तव्य बजावले आहे. नेपाळमधील प्राणीमित्र सेवाभावी संस्थांनाही या भूकंपाचा हादरा बसल्याने इतर देशांतील प्राणीमित्र संस्थांनी पुढाकार घेत नेपाळमध्ये धाव घेतली आहे.
नेपाळमधील भूकंपानंतर झालेल्या हानीत तेथील ढिगाऱ्यांखाली अनेक प्राणी जखमी झाले होते. नेपाळमधील गोशाळांनाही भूकंपाचा धक्का बसला होता. त्यातही अनेक प्राण्यांना गंभीर इजा झाली होती. या प्राण्यांवर उपचार करणाऱ्या नेपाळमधील सेवाभावी प्राणीमित्र संस्थांचीही हानी झाली असल्याने या संस्था या प्राण्यांवर उपचार करण्यास असमर्थ ठरल्या होत्या. या सेवाभावी संस्थांनी जगभरातील प्राणीमित्र संस्थांना मदतीची हाक दिली होती.
या हाकेला प्रतिसाद देत मुंबईतील श्री रामानुग्रह ट्रस्ट, डोंबिवलीतील ‘पॉज’ (PAWS) आणि पुण्यातील पीपल फॉर अॅनिमल (PFA) या तीन संस्थांचे पाच प्रतिनिधी औषधे, खाण्यापिण्याचे साहित्य आदी घेऊन नेपाळला रवाना झाले. भूकंपानंतर नेपाळमधील परिस्थिती अत्यंत बिकट होते. रस्त्यावरील कुत्रे, मांजरी ढिगाऱ्याखाली सापडले होते. त्यापैकी काहींचा बळी गेला होता, तर काही जखमी अवस्थेत होते.
भूकंपात बेघर झालेल्या अनेकांनी आपल्या पाळीव प्राण्यांना सोडून दिले होते. गोशाळांमधील गायी, बैल यांनाही दुखापत झाली होती. त्या सर्वावर उपचार करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडली, असे श्री रामानुग्रह ट्रस्टच्या ओमकार राणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
या प्राण्यांवर उपचार करण्याबरोबरच त्यांना सकस आहार देण्याचीही गरज होती. ते कामदेखील इतर संस्थांच्या मदतीने भारतातील आमच्या संस्थांनी केल्याचे ओमकार यांनी सांगितले.
रोहन टिल्लू, मुंबई
भूकंपग्रस्त प्राण्यांना प्राणीमित्रांची मदत
नेपाळमध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर आता देशविदेशांतून तेथे मदतीचा ओघ सुरू झाला असला, तरी ही मदत प्रामुख्याने तेथील माणसांसाठी आहे.
First published on: 15-05-2015 at 12:43 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Organizations to help animals affected by earthquake nepal