सरत्या मे महिन्यात उष्णेतेने कमाल पातळी गाठल्याने दिवसा सर्वसामान्यांचा जीव आधीच मेटाकुटीस आलेला असताना रात्रीही लग्नानिमित्त झडणाऱ्या हळदी समारंभांनी अनेकांच्या झोपेचे खोबरे होऊ लागले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात लग्नापेक्षा हळदी समारंभांना विशेष महत्त्व असते. लग्नाच्या आदल्या रात्री त्यानिमित्त सामिष भोजन तसेच मद्याच्या पाटर्य़ा झडतात. हल्ली मात्र हळदी समारंभ रितीरिवाजांपेक्षा प्रतिष्ठा आणि मोठेपणा दाखवून देण्यासाठी साजरे होऊ लागले आहेत. त्यामुळे हळदी समारंभाचे मोजमाप ‘किती किलो मटण शिजले आणि बिअरचे किती खोके संपले’ यावर केले जाऊ लागले आहे. विशेष काळजीची बाब म्हणजे हळदी समारंभांनिमित्त गावातील अनेक किशोरवयीन मुले प्रथमच मद्याच्या प्याल्याची दीक्षा घेऊ लागले आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या गावांमधील लग्न समारंभातही बिअरचे पाट वाहात असतात. आता हे लोण मोठय़ा प्रमाणात शहरी भागातही पसरले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक उत्सवांमधील ध्वनिप्रदूषणावर र्निबध घातले आहेत. हळदी समारंभात मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असूनही परिसरातील पोलीस स्वत:हून कारवाई करण्याबाबत उदासिनता दाखवितात. कुणी तक्रार केलीच, तर नाइलाजाने कारवाईचे नाटक केले जाते. सार्वजनिक ठिकाणी दहा वाजेपर्यंतच वाद्ये वाजविण्यास अथवा लाऊड स्पीकर्स लावण्यास परवानगी असताना अगदी बारा-एक वाजेपर्यंत कर्कश ढणढणाटात हळदी समारंभ सुरू असतात. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना अक्षरश: बधिर कानांनी तो समारंभ संपण्याची वाट पाहात जागत रहावे लागते.
इथे नांदतो तंटा
आधुनिक महाराष्ट्राने अवलंबिलेल्या तंटामुक्ती अभियानास या हळदी समारंभांमध्ये सर्रास हरताळ फासला जातो. एकमेकांची उणी-दुणी काढण्यासाठी हळदी समारंभांचा वापर केला जातो. त्यामुळे हळदी समारंभ म्हणजे भांडणं असे जणू काही समीकरणच बनून गेले आहे. त्यामुळेच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने सार्वजनिक उत्सवांसाठी जशी आचारसंहिता आखून दिली, तशी आचारसंहिता हळदी समारंभांनाही लागू करावी, अशी मागणी सुबुद्ध नागरिक करू लागले आहेत.
नाव हळदीचे रंग पैशाचा
झपाटय़ाने होणाऱ्या नागरीकरणामुळे सध्या ठाणे जिल्ह्य़ात जमिनींना सोन्याचे भाव आहेत. शहरांलगतच्या गावांच्या जमिनी प्रतिचौरस फूट दराने विकल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे साहजिकच ग्रामीण भागातील रहिवाशांच्या हाती पैसा खुळखुळू लागला आहे. सर्वसामान्यपणे बहुतेक शेतकऱ्यांकडे किमान एक एकर जागा असते. त्या एक एकर जागेचे बाजारमूल्य आता कोटीच्या घरात आहे. हळदी समारंभांच्या निमित्ताने या पैशाचे रंगढंग दिसू लागले आहेत. त्यातूनच मग डीजेंऐवजी ऑक्रेस्ट्रा, लावणी नृत्य असे कार्यक्रम मोठमोठय़ा बिदाग्या देऊन आयोजित केले जाऊ लागले आहेत. मग दारूच्या नशेत कलावंतांवर दौलतजादाही होऊ लागला आहे.