वाशिमच्या कृषी विभागातील सावळ्यागोंधळामुळे आईवडिलांपासून पोरक्या झालेल्या नागेश आणि शुभंम हातोलकर यांना रोजगारासाठी अकोल्यात भटकंती करावी लागत आहे. वाशिम येथील कृषी विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयातील सावळ्यागोंधळामुळे गेल्या पाच वर्षांपासून अनुकंपा नोकरीसाठी पात्र असताना नोकरी लागत नसल्याची खंत नागेश हातोलकर या युवकाने व्यक्त केली. उदरनिर्वाहासाठी कुठलेही साधन नसल्याने आता येथील खाजगी दवाखान्यात नागेश नोकरी करून लहान भावाचे शिक्षण पूर्ण करत आहे.
वाशिम जिल्ह्य़ातील मालेगाव येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पांडुरंग हातोलकर कार्यरत होते. त्यांचा ह्रदयविकाराने ८ डिसेंबर २००६ रोजी मृत्यू झाला. पांडुरंग हातोलकर यांच्या मृत्यूचा धक्का सहन न झालेल्या पत्नी वनमाला यांनी त्यांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या महिन्यात गळफास घेत आत्महत्या केली. वडीलांचा अकाली मृत्यू आणि आईच्या जाण्याने नागेश आणि शुभंम दोघेही पोरके झाले. रोजगाराच्या शोधात त्यांनी काही दिवस वाशिम जिल्ह्य़ात काढले. पण, योग्य तो रोजगार न मिळाल्याने अखेर त्यांनी अकोला गाठले. नागेश आता येथील एका खाजगी रुग्णालयात डॉक्टरांना सहाय्यक म्हणून काम करत आहे.
पांडुरंग हातोलकर यांच्या मृत्यूनंतर सज्ञान झालेल्या नागेश याला शासकीय स्तरावर अनुकंपातत्वावर नोकरी देण्याची गरज होती. पण, शासकीय कार्यालयातील ढिसाळ कारभार व अव्यवस्थेचा फटका त्याला बसला. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय व कृषी विभागाने नियमानुसार काम केले असते तर नागेशला २००८ मध्ये नोकरी लागली असती. पण, कृषी विभागातील बाबूंनी त्याची फाईल (नाव) पुढे सरकवली नाही आणि जिल्हाधिकारी कार्यालयास वस्तुनिष्ठ अहवाल पाठविला नाही. अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरीचा हक्कदार असताना गेल्या पाच वर्षांंपासून नागेशची भटकंती सुरु आहे.
वाशिम जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात मुळात नागेश हातोलकर हा क्रमांक एकवर अनुकंपित आहे. असे असताना त्याच्या अगोदर भास्कर भावे व अनिल सुर्यवंशी या दोन व्यक्ती अनुकंपाच्या प्रतीक्षेत होते. या  दोन्ही व्यक्तींपैकी भास्कर भावे मुलाखतीत सतत गैरहजर राहत आहेत, तर अनिल सुर्यवंशी हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १ डिसेंबर २००५ मध्ये वाशिम शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अनुकंपातत्वावर नोकरीस लागले. त्यामुळे अनिल सुर्यवंशी यांचे नाव विभागाने वगळण्याची गरज होती. पण, कृषी विभागाने अनिल सुर्यवंशी यांचे नाव वगळले नाही. २००५ मध्ये अनिल सुर्यवंशी नोकरीस लागल्यानंतर नागेश हातोलकर यांचा क्रमांक पुढे येतो. पण, कृषी विभागाने त्यानंतर २००७, २००८ व २००९ या तीन वर्षांत भास्कर भावे व अनिल सुर्यवंशी यांना नियुक्तीसाठी पत्र देत बोलावणे सुरू ठेवले. ते हजर न झाल्याचे खोटेकारण पुढे करत नागेश हातोलकर याला मात्र कृषी विभागाने अद्याप नोकरी दिली नाही.
नागेश यांच्याजवळ या संबंधीची सर्व कागदपत्रे आहेत. त्यांनी यासंबंधी वारंवार वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय व कृषी विभागाकडे दाद मागितली. पण, केवळ शासकीय अनास्था व अनियमिततेमुळे आईवडिलांपासून पोरके झालेला नागेश यांना गेल्या पाच वर्षांपासून हक्काची नोकरी मिळत नसल्याचे चित्र आहे. अकोल्यात खाजगी नोकरी केल्यावर वाशिम कृषी अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयात सतत नागेश अजूनही चकरा मारत आहे. पण, त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती त्याने दिली. वाशिम जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात सहानुभूतीपूर्वक लक्ष देण्याची मागणी नागेश व शुभंम यांनी संयुक्तरित्या केली आहे.

Story img Loader