रेल्वे रूळावर कोणी फेकून दिलेले साक्षात मृत्यूच्या दाढेतून बचावलेले..शेवटचा घटका मोजत झोपडीत कोणी बेवारस स्थितीत सापडलेले..वडिलांच्या निधनानंतर आईने रेल्वे ठाण्यावर सोडून दिलेले..बाल्यावस्थेतच  हरपल्याने कुणाच्या नशिबी अनाथाचे जीवन आलेले..अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या नानाविध कथा ऐकल्यावर येथील के. बी. एच. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मने अक्षरश: हेलावून गेली. एकीकडे नियती जणू जगण्याचा हक्कच नाकारत असल्यागत असणारी प्रतिकूल परिस्थिती आणि या परिस्थितीवर मात करतानाच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आकाश कवेत घेण्यासाठीची या अनाथांची धडपड थक्क करणारी असल्याची प्रचिती यानिमित्ताने आली.
निळगव्हाण येथील आश्रय संस्कार केंद्रात नववर्षांनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बालकांचा पूर्वइतिहास तसेच त्यांचे भवितव्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला.
काही वर्षांपूर्वी मनमाड येथे रेल्वे रूळावर एका चिमुरडीला टाकून देण्यात आले होते. पोलिसांनी तिला केंद्रात दाखल केले. गितांजली एक्स्प्रेस वरून गेल्यानंतरही दोन रूळांमधील जागेत असल्याने केवळ नशिबाने बचावलेल्या या चिमुरडीचे नामकरण मग ‘गितांजली’ असे करण्यात आले. गितांजली चौथ्या इयत्तेत असताना मालेगावच्या तत्कालिन प्रांताधिकारी पद्मजा कोळपकर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रात आल्या होत्या. त्यावेळी गितांजलीने आपणांस तुमच्यासारखे जिल्हाधिकारी होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. दहावीपर्यंत येथे शिक्षण घेतल्यानंतर सध्या ती नाशिक येथे बारावीत शिक्षण घेत आहे.
एखाद्याने गावाबाहेरील एका झोपडीतून बालकाचा रडण्याचा आवाज ऐकू आल्याने तेथे गर्दी जमा झाली. आतमध्ये मरणासन्न अवस्थेत साधारणत: सहा महिन्याचे बालक आढळून आले. त्याला वाऱ्यावर सोडून पालक परागंदा झाले असण्याची शक्यता दिसत होती. योगायोगाने आश्रय संस्थेचे विश्वस्थ हरिप्रसाद गुप्ता हे त्याच भागातून जात होते. त्यांनी या बालकास रूग्णालयात दाखल केले. बरे झाल्यावर त्याला केंद्रात आणले. आता तो २२ वर्षांचा झाला असून अनाथ मुलांवर देखरेख ठेवण्याचे काम करीत आहे. मध्य प्रदेशातील एका स्थानकात बिस्किटचा पुडा घेण्यासाठी रेल्वेतून खाली उतरलेला तीन वर्षांचा मुलगा तेवढय़ा वेळेत रेल्वे निघून गेल्याने आईपासून कायमचा दुरावला. त्याला काही दिवस भिवंडी येथील बाल निरीक्षण गृहात आणि नंतर या केंद्रात दाखल करण्यात आले. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यावर मुंबईच्या आदित्य बिर्ला सेंटरमधून त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सध्या तो मुंबईत नोकरी सांभाळून रात्रमहाविद्यालयातून पुढील शिक्षण पूर्ण करीत आहे.
या संस्थेच्या मदतीने निवास व शिक्षणाची सोय उपलब्ध झालेले अनेक अनाथ मुले व मुली आज स्वत:च्या पायावर उभी राहिली आहेत. संस्थेच्या वतीने आतापर्यंत दहा अनाथ मुलींचे विवाह जमविण्यात आले आहेत. येथून बाहेर गेलेले बहुतेक जण हे रक्षाबंधन आणि दीवाळीत हमखास या अनाथाश्रयालयास भेट देतात अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. शामकांत पाटील यांनी दिली.

Story img Loader