‘लाइफ ऑफ पाय’ चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला आणि इकडे लातूरकरांचा आनंद द्विगुणित झाला. सातासमुद्रापार पार पडलेल्या झगझगीत सोहळय़ात जाहीर झालेल्या एका पुरस्काराचा आणि लातूरमधल्या एका व्यक्तीचा संबंधच असा काही होता, की सर्वाची मान अभिमानाने ताठ व्हावी. ही दिमाखदार कामगिरी करून दाखविणाऱ्या मराठमोळय़ा व्यक्तीचे नाव आहे सिद्धार्थ लहरीकांत शहा. ‘लाइफ ऑफ पाय’ चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट ज्या कंपनीने बनविले, त्या ‘ऱ्हिदम अॅण्ड हय़ूज’मध्ये सिद्धार्थ टीम लीडर म्हणून काम करतो. एका अर्थाने ऑस्कपर्यंत चित्रपटाचा दर्जा पोहोचविण्यात सिद्धार्थचाही खारीचा वाटा होता. मराठवाडय़ाला याचा सार्थ अभिमान आहे. त्यामुळेच सिद्धार्थ शहा हे नाव चर्चेत आले.
सिद्धार्थ मूळचा लातूरचा. तसा सामान्य बुद्धिमत्तेचा. वडील लहरीकांत शहा प्रसिद्ध चित्रकार. हौशी छायाचित्रकार म्हणूनही लातूरकर त्यांना ओळखतात. चित्रकलेचे कोणतेही लौकिक शिक्षण न घेता लहरीकांत शहा यांनी चित्रकला जोपासली.
सिद्धार्थला कलेचे बाळकडू घरातच मिळाले. पहिली ते दहावीपर्यंत तो बंकटलाल इंग्लिश स्कूलमध्ये शिकला. शाळेत असताना चित्रकलेची पारितोषिके त्याने पटकावली. एकदा सिद्धार्थ हा अतुल देऊळगावकरांबरोबर महाबळेश्वर ट्रेकिंगला गेला. तेव्हा तो घरातून पहिल्यांदाच बाहेर पडला होता. पाचवीत त्याला ट्रेकिंगचा छंद जडला आणि पुढे त्याने नववीत असेपर्यंत नवी दिल्ली, नैनीताल अशा ठिकाणी ट्रेकिंग केले. सोबत कॅमेरा असायचा. निसर्गात फिरण्याचा मनसोक्त आनंद त्याने घेतला.
बारावीनंतर पुणे येथे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगला त्याला प्रवेश मिळाला आणि तेथून खऱ्या अर्थाने व्हिज्युअल इफेक्टच्या शिक्षणाची पायाभरणी झाली. इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षांत असताना अॅनिमेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. एखादा अभ्यासक्रम करायचा आहे, असे मुलाने सांगावे आणि तो तू खुशाल कर असे वडिलांनी म्हणावे, अशी नात्याची वीण असल्याने सिद्धार्थने अॅनिमेशनमधला ‘टूडी’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. याच संस्थेत प्रशिक्षक म्हणूनही काम केले.
इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षांत प्रशिक्षकपदाची नोकरी त्याने सोडली. त्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, करीअर वेगळे असायला हवे, असे सिद्धार्थला नेहमी वाटे. म्हणूनच इंटरनेटवर थ्रीडी अभ्यासक्रमाची माहिती मिळविली आणि चेन्नई येथे इमेज संस्थेची ऑनलाइन परीक्षा दिली. त्यात तो उत्तीर्ण झाला आणि पुढचा अभ्यासक्रम चेन्नईत पूर्ण करण्याचे ठरविले. अभ्यासक्रमाची ही सगळी ‘जांगजोड’ त्याने स्वत: केली. अशा कामात कुटुंबीयांनी वेळ दवडू नये, असे तो म्हणतो. ज्या व्यवसायात रोज नवी आव्हाने आहेत, नवे करण्याची संधी आहे, असाच व्यवसाय अथवा नोकरी करायची, असे त्याने ठरविले होते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर व्हिज्युअल इफेक्ट या श्रेणीत तो चांगलाच तरबेज झाला. परिणामी त्याला ‘ऱ्हिदम अॅण्ड हय़ूज’ या कंपनीत नोकरी मिळाली.
दहावी-बारावीपर्यंत सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या सिद्धार्थ लहरीकांत शहा याने आता मोठे यश मिळविले. लातूरकरांचा सिद्धार्थ आता आदरार्थी विशेषणांचा भाग बनला आहे. लातूरसारख्या छोटय़ा गावात शिकताना तसे सिद्धार्थ शहा यांचे भाषेवरील प्रभुत्व फार चांगले श्रेणीतले नव्हते.
छोटय़ा गावातील इंग्रजी शाळेत शिकलेल्या सिद्धार्थ शहा यांना त्यांच्या भाषेवर मेहनत घ्यावी लागली. त्यांनी आतापर्यंत ४०पेक्षा अधिक चित्रपटांमधील अॅनिमेशन पूर्ण केले आहे. यापूर्वी ‘गोल्डन कंपास’ या चित्रपटात दृश्य परिणाम याच श्रेणीत त्यांच्या टीमला ऑस्कर पुरस्कार मिळाला. सिद्धार्थ यांची पत्नी नेहादेखील या कंपनीत सिद्धार्थबरोबर काम करतात.
सामान्य कुटुंबातील सिद्धार्थ चांगल्या चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कसा पोहोचला याचे उत्तर त्याचे वडील लहरीकांत शहा देतात. ते म्हणतात, मुलांवर संसार केले जातात असे म्हणणे चूक आहे. कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवार यांच्या सहवासातून मुलांची जडणघडण होते. त्यांच्या मनातील भीती दूर केली पाहिजे. त्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली पाहिजेत. ‘मोठय़ांना नमस्कार कर’, ‘श्लोक म्हण’, ‘देवाच्या पाया पड’ अशा सूचना मुलांना दिल्या की फार संस्कार केले असा सार्वत्रिक समज आहे. मुळात मुलांना कोणतीही बाब करताना हे का करायचे ते पालकांना सांगता आले पाहिजे, त्यातूनच मुले घडतात. मुलांचे कुतूहल संपले, की त्यांच्या विचाराला कुलूप लागते. अशी अनेक कुलपे पालक लावत असतात. मुले मोठी झाल्यावर त्या कुलपांची चावी पुन्हा हातात घेऊन उपयोग नसतो. कारण तोपर्यंत कुलूप गंजून गेलेले असते.
लहरीकांत शहा यांनी असे संस्कार देण्याऐवजी सिद्धार्थच्या आयुष्यात बरेच काही दिले. पण त्याचे वडील तसाही दावा करीत नाही. विजय तेंडुलकरांपासून ते अमृत गंगपर्यंत अनेकांशी पत्रव्यवहार होता. ते घरीही येत असे. याचा कळत नकळत परिणाम सिद्धार्थवर झाला असावा. त्याच्या करीअरमध्ये कधीही अडथळा येऊ द्यायचा नाही, असे ठरविले होते. आता तो यशस्वी झाला आहे. ‘लाइफ ऑफ पाय’च्या निमित्ताने सिद्धार्थ शहा या लातूरच्या तरुणाची कामगिरी जगाच्या नकाशावर गेली आहे. त्याचा प्रवास थक्क करणारा आहे.
लातूरकर सिद्धार्थची ‘ऑस्कर’भरारी!
‘लाइफ ऑफ पाय’ चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला आणि इकडे लातूरकरांचा आनंद द्विगुणित झाला. सातासमुद्रापार पार पडलेल्या झगझगीत सोहळय़ात जाहीर झालेल्या एका पुरस्काराचा आणि लातूरमधल्या एका व्यक्तीचा संबंधच असा काही होता, की सर्वाची मान अभिमानाने ताठ व्हावी.
First published on: 02-03-2013 at 02:18 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oscar flight siddharth of latur