उस्मानाबाद शहराला उजनी जलाशयातून पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. शहरात जलवाहिनीद्वारे पाणी पोहोचल्याचे दररोज सांगितले जाते. तथापि, पाणीपुरवठा होत नाही. दररोज टँकरने होणाऱ्या पाणीपुरवठय़ावर नागरिक नाखूश आहेत. यास राज्य सरकार जबाबदार असल्याने त्यांचा ‘तेरावा’ घालून सुमारे एक हजार शिवसैनिकांनी सामूहिक मुंडण केले!
उस्मानाबादेत हे आंदोलन सुरू असताना विधानसभेत याच प्रश्नावर आमदार ओमराजे निंबाळकर यांनीही गदारोळ केला. राजदंड पळविल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ उद्या (बुधवारी) ‘उस्मानाबाद बंद’ पुकारण्यात आला आहे.
उजनीतून पाणी आल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते डॉ. पद्मसिंह पाटील व राणा जगजीतसिंह पाटील यांनी ‘कौतुक’ सोहळे उरकून घेतले. दररोज जलपूजनाचा एक कार्यक्रम घेतला जात असे. गल्लीबोळातल्या देवतांपासून ते थेट तुळजाभवानीपर्यंत सर्व देवांना अभिषेकही करण्यात आले. मात्र, दररोज जलवाहिनी फुटे नि शहरातील पाणीपुरवठय़ाच्या शुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचायचे नाही. परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून विस्कळीत असणारा पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. शहरातील काही भागात एक महिन्यापासून पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांचा राग वाढत चालला होता. उजनीचे पाणी राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आले, असे सांगत शहरभर फलकही लावण्यात आले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी योजनेत अपहार केला. मात्र, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अतिरिक्त निधी दिल्यामुळे शहरात पाणी आल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत होते. श्रेय घेण्यावरून सुरू असणाऱ्या या धडपडीत सर्वसामान्य माणसांचे मात्र हाल सुरू आहेत. अशा स्थितीत सरकारला धारेवर धरण्यासाठी शिवसेनेने मंगळवारी सरकारचा ‘तेरावा’ असल्याचे जाहीर केले व एक हजार शिवसैनिकांनी मुंडण केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र गायकवाड, उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले. जिल्हाभरातील शिवसैनिक यात सहभागी झाले. पाणी न आल्याने नागरिकही वैतागले आहेत. पाणी येईल तेव्हा येईल; किमान पाणी आले म्हणून श्रेय घेण्यासाठी नाटके तरी करू नका, अशी प्रतिक्रिया उस्मानाबादकर व्यक्त करीत आहेत. दरम्यान, विधानसभेतही आमदार ओम राजेनिंबाळकर यांनी पाण्याचा प्रश्न उचलून धरला. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, बदनापूरचे आमदार संतोष सांबरे यांनीही पाण्याच्या अनुषंगाने सभागृहात बाजू लावून धरली. शिवसेनेचे आमदार ओम राजेनिंबाळकर यांना एक वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या निलंबनाच्या निषेधार्थ उस्मानाबाद बंद ठेवून शिवसेना सरकारचा निषेध करेल, असे जिल्हाप्रमुख रवींद्र गायकवाड यांनी सांगितले.
नगरपालिका निवडणुकीत तीन महिन्यांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेले उस्मानाबादकर पवार यांचे आश्वासन विसरले नाहीत. उस्मानाबादचे जावई असणाऱ्या पवार यांना ‘घटस्फोट’ दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही या वेळी देण्यात आला. पाणीप्रश्नी भाजपही शिवसेनेसोबत असल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सांगितले.
निष्क्रियता लपविण्यासाठी नाटक
निष्क्रियता लपविण्यासाठी आमदार ओम राजेिनबाळकर उपोषण व राजदंड पळविण्यासारखे नाटक करीत आहेत. पाणीयोजना व्हावी, असे वाटत असते तर त्यांनी जे शेतकरी जलवाहिनीसाठी अडथळा निर्माण करतात, त्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या असत्या. तसे न करता केवळ श्रेय घेण्यासाठी सारे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी केला. खासदार डॉ. पद्मसिंह पाटील व राष्ट्रवादीवर केल्या जाणाऱ्या आरोपाविषयी फौजदारी खटला दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज उस्मानाबादेत ‘बंद’
उस्मानाबाद शहराला उजनी जलाशयातून पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. शहरात जलवाहिनीद्वारे पाणी पोहोचल्याचे दररोज सांगितले जाते. तथापि, पाणीपुरवठा होत नाही. दररोज टँकरने होणाऱ्या पाणीपुरवठय़ावर नागरिक नाखूश आहेत. यास राज्य सरकार जबाबदार असल्याने त्यांचा ‘तेरावा’ घालून सुमारे एक हजार शिवसैनिकांनी सामूहिक मुंडण केले!
First published on: 17-04-2013 at 02:38 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Osmanabad closed today