जिल्हय़ातील १ लाख ४५ विद्यार्थ्यांपर्यंत एकाच वेळी सुरक्षेचे संदेश पोहोचविण्याचा रस्ता सुरक्षा कार्यक्रमातील उपक्रम उस्मानाबाद पॅटर्न म्हणून आता राज्यस्तरावर स्वीकारण्यात आला आहे. परिवहन आयुक्तांनी राज्यातील ५० आरटीओ कार्यालयांना रस्ता सुरक्षेचा उस्मानाबाद पॅटर्न राबविण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यभरात १ ते १५ जानेवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. यात ठोस व दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या प्रयत्नांचा समावेश असतो. या अभियानात उस्मानाबाद जिल्ह्यात विशेष उपक्रम राबविण्यात आला. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियम व त्यासंबंधीची माहिती देऊन विद्यार्थिदशेतच त्यांच्या वाहतूकविषयक जाणिवा अधिक प्रगल्भ करण्याचा प्रभावी प्रयत्न केला. त्याला तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी, जिल्हय़ातील एक लाख ४५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत रस्ता सुरक्षा समितीद्वारे रस्ता सुरक्षेचा उस्मानाबाद पॅटर्न प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. चव्हाण यांनी रस्ता सुरक्षेबाबत शालेय स्तरावर उपयुक्त अशी छोटेखानी आकर्षक पुस्तिका तयार केली. जिल्हाधिकारी डॉ. गेडाम व मुख्य कार्यकारी अधिकारी हरिदास यांच्याशी चर्चा करून ती सर्वशिक्षा अभियानातून छापण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेने जिल्हास्तरावर ‘मास्टर ट्रेनर’ तयार करून यातील माहिती जिल्ह्यातील प्रत्येक शाळांपर्यंत पोहोचविण्यात आली. जिल्ह्यातील सर्व शाळांमधून दररोज रस्ता सुरक्षेबाबतचे धडे देण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी ते नियम अभ्यासक्रमाचा भाग म्हणून अंगीकारला.
जून २०१२पासून शाळास्तरावर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयाबाबत प्रशिक्षण, माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. ठरवून दिलेल्या टप्प्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही, याचा आढावा घेण्यात आला. शैक्षणिक वर्षांच्या शेवटी संबंधित विषयाबाबत विद्यार्थ्यांना कितपत आकलन झाले, याची पडताळणी करण्याचे ठरविण्यात आले. चव्हाण यांनी बहुपर्यायी प्रश्नावली तयार करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पडताळणी चाचणी घेतली. यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमधून इयत्ता ५वी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची एकाचवेळी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस एक लाख ४५ हजार विद्यार्थी बसले होते. त्यातील १३०० विद्यार्थ्यांनी ४० पकी ४० गुण प्राप्त केले. तर ९० टक्के विद्यार्थ्यांना २०पेक्षा अधिक गुण मिळाले. जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या या उपक्रमास आता रस्ता सुरक्षेचा उस्मानाबाद पॅटर्न म्हणून गौरविण्यात आले. सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांपर्यंत रस्ता सुरक्षा हा विषय मोठय़ा मनोरंजकपणे पोहोचविल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास व परिवहन अधिकारी चव्हाण यांचे कौतुकही राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.