मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ सोलापुरात होण्यासाठी सोलापूर बार असोसिएशनने हाती घेतलेल्या आंदोलनाला उस्मानाबाद, उमरगा व तुळजापूर येथील वकील संघांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवशंकर घोडके यांनी केला आहे.
बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने उस्मानाबाद, उमरगा व तुळजापूर येथे जाऊन तेथील वकील मंडळींची भेट घेतली असता उमरगा बार असोसिएशने सोलापुरात उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत दोन दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालण्याची घोषणा केल्याचे सोलापूर बार असोसिएशनने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उस्मानाबाद येथे शिवसेनेचे आमदार ओमराजे निंबाळकर यांनीही सोलापूरकरांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. या प्रश्नावर शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही आमदार निंबाळकर यांनी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. तुळजापूर बार असोसिएशनने देखील उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ सोलापुरात होण्यासाठी सकारात्मक भूमिका मांडली. या फिरत्या खंडपीठामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सामान्य पक्षकार व वकील मंडळीची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे या आंदोलनाला समर्थन देण्याचे उस्मानाबाद जिल्हयातील वकिलांनी ठरविल्याचे बार असोसिएशनचे अध्यक्ष घोडके यांनी सांगितले. या शिष्टमंडळात महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य मिलिंद थोबडे यांच्यासह मंगला चिंचोळकर, अ‍ॅड. रजाक शेख, अ‍ॅड. संजीव सदाफुले, अ‍ॅड. महेश जगताप, अ‍ॅड. नागेश कुलकर्णी, अ‍ॅड. सुरेश गायकवाड, अ‍ॅड. आय. ए. शेख, अ‍ॅड. विनोद सूर्यवंशी आदींचा समावेश होता.
दरम्यान, फिरत्या खंडपीठासाठी जिल्हा न्यायालयाबाहेर वकिलांनी चालविलेले चक्री उपोषण सुरूच आहे. या चक्री उपोषणात अ‍ॅड. मल्लिनाथ राचेटी, अ‍ॅड. ए. आर. रायनी, अ‍ॅड. रियाज शेख, अ‍ॅड. एन. एस. सरवदे, अ‍ॅड. विद्यावंत पांढरे, अ‍ॅड. शशी कुलकर्णी, अ‍ॅड. शैलेश दळवी आदींनी प्रामुख्याने सहभाग घेतला होता.