भारतीय राज्यघटनेबाबत नागरिकांना जास्तीत जास्त माहिती व्हावी, राज्यघटनेचे विविध पैलू लोकांसमोर उलगडले जावेत या उद्देशाने अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचा ‘आपले संविधान, आपला आत्मसन्मान’ हा कार्यक्रम येत्या २० सप्टेंबरपासून दूरचित्रवाहिन्यांवरून सुरू होत आहे. दर रविवारी एका तासाचा हा कार्यक्रम एकाच वेळी चार वाहिन्यांवरून प्रसारित केला जाणार आहे.  सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या बाबत अधिक माहिती देताना डॉ. जाधव म्हणाले, राज्यघटनेविषयीची सविस्तर माहिती नागरिकांना व्हावी आणि त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. दर रविवारी सकाळी दहा वाजता एबीपी माझा, आयबीएन लोकमत, मी मराठी आणि सह्य़ाद्री या वाहिन्यांवरून त्याचे प्रसारण होणार आहे. सूत्रसंचालन व संवादकाच्या भूमिकेत आपण स्वत: असणार आहोत.कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, ज्येष्ठ विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तेरा भागांच्या कार्यक्रमांपैकी अकरा भागांचे चित्रीकरण पार पडले असून या भागात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांच्यासह विकास शिरपूरकर, हेमंत गोखले, नरेंद्र चपळगावकर आदी निवृत्त न्यायाधीश तसेच अविनाश धर्माधिकारी, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, भारतकुमार राऊत, श्रीहरी अणे, उदय वारुंजीकर हे मान्यवर सहभागी होणार आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील याही एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असून हे विद्यार्थी आणि सहभागी मान्यवर मंडळी यांच्यात थेट प्रश्नोत्तरेही होणार आहेत. ‘भारतीय राज्यघटना मनामनात आणि घराघरात’ पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा