गेल्या पिढीतील ज्या राजकीय नेत्यांनी पुण्याच्या राजकारणावर स्वकर्तृत्वाची छाप उमटवली त्यात शिवसेनेचे नेते (कै.) पांडुरंग सावळाराम ऊर्फ काका वडके यांचे नाव अग्रणी होते. बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख होण्याच्याही आधीपासून वडके कुटुंबीयांशी त्यांचे नाते जुळले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर काकांची निस्सीम भक्ती होती आणि बाळासाहेबांचेही त्यांच्यावर विलक्षण प्रेम होते. काका वडके यांचा पुण्याच्या राजकारण आणि समाजकारणावर खऱ्या अर्थाने ठसा उमटला होता. शिवसेनेच्या माध्यमातून ते अनेक वर्षे सक्रिय राजकारणात राहिले. शिवसेनेची ती मुलूखमैदान तोफ होती आणि ती बाळासाहेबांच्या विचारातून धडाडत असे. काकांचा खरा पिंड विधायक समाजकारण्याचा होता. ते कट्टर शिवसैनिक होते, तसेच निस्सीम सावरकरभक्तही होते. गणेशोत्सवावरही त्यांचे प्रेम होते. काका खऱ्या अर्थाने उत्सवातील कार्यकर्ते होते आणि त्यामुळेच त्यांनी बाळासाहेबांना पुण्यात आमंत्रित केले होते. काकांची पत्नी स्नेहलता ऊर्फ भाभी आणि त्यांचे पुतणे रामअप्पा वडके यांच्याकडे बाळासाहेबांच्या कितीतरी आठवणींचा खजिनाच आहे. अशा कितीतरी आठवणींना वडके कुटुंबीयांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना उजाळा दिला. काकांची कसबा पेठेतील ‘गुरुकृपा’ ही राहती वास्तू बाळासाहेबांच्या आठवणींची साक्षीदार आहे.
‘मार्मिक’चे संपादक बाळ ठाकरे
ही आठवण आहे बाळासाहेब ठाकरे यांची; पण जेव्हा ते शिवसेनाप्रमुख नव्हते तेव्हाची. बाळासाहेबांची ओळख तेव्हा ‘मार्मिक’चे संपादक बाळ ठाकरे अशी होती. शिवसेनेचा जन्मही तेव्हा झालेला नव्हता. काका वडके ‘मार्मिक’चे वाचक होते आणि चाहतेही होते. कसबा पेठेत त्यांनी जय महाराष्ट्र मंडळ या गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली होती आणि या मंडळाच्या माध्यमातून ते सक्रिय होते. ही गोष्ट आहे १९६५ सालातील. काका सहकुटुंब मुंबईला गेले होते आणि बाळासाहेबांच्या प्रेमापोटी ते त्यांना भेटायला गेले. बाळासाहेबांची भेट मिळेल की नाही हे माहिती नव्हते. कारण पूर्वीची काही ओळख नव्हती; पण भेटीची इच्छा मात्र तीव्र होती. पुण्याहून आल्याचे सांगितल्यानंतर थोडय़ाच वेळात बाळासाहेब भेटीसाठी आले. चौकशी झाली. गप्पा सुरू झाल्या. काका आणि सर्वासाठी स्वत: बाळासाहेबांनी त्या काळी मिळणाऱ्या ‘ऑरेंज’च्या बाटल्या मागवल्या. काकांनी त्या भेटीत गणेशोत्सवात देखाव्याच्या उद्घाटनासाठी पुण्याला येण्याचे निमंत्रण बाळासाहेबांना दिले आणि त्यांनीही ते लगेच स्वीकारले. त्या भेटीत झालेल्या निश्चितीनुसार बाळासाहेब पुण्यात गणेशोत्सवात आले, तो दिवस होता १ सप्टेंबर १९६५. मंडळाने प्रकाशित केलेल्या त्या वर्षीच्या अहवालातील निमंत्रणपत्रिका अशी होती.. ‘मंडळाच्या सजावटीचे उद्घाटन ‘मार्मिक’चे संपादक श्री. बाळ ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाला आपण आपल्या मित्रमंडळींसह हजर राहावे. स्थळ – शिंपी आळी, कसबा पेठ.’
पुण्यातील हक्काचे घर
पुढच्या वर्षी म्हणजे १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्यातील हक्काचे घर म्हणजे काकांची कसब्यातील गुरुकृपा ही वास्तू. तेव्हापासून पुढे कितीतरी वर्षे बाळासाहेब पुण्यात आले की काकांकडे अगत्याने येत असत. भोजनही काकांच्याच घरी असे. अनेकदा राजही सोबत आलेला असे. पुढे उतरण्याची ठिकाणे बदलत गेली, तरी काकांकडील फेरी कधीही चुकली नाही. बाळासाहेब पुण्यात इतरत्र उतरले, तरीही जेवणाचा डबा काकांच्या घरूनच जायचा. बाळासाहेबांच्या सुरुवातीच्या पत्रकार परिषदा देखील काकांच्या घरीच झाल्या होत्या. बाळासाहेबांबरोबर नेहमी मीनाताई देखील असायच्या. बाळासाहेब कधी पुण्यात एकटे आले असे व्हायचे नाही. वहिनी आल्या की कधी कधी भाभी वडके आणि मीनाताई खरेदीला किंवा फेरफटका मारायला देखील पुण्यात पायी फिरायच्या. कधी कधी तुळशीबागेतही दोघी खरेदीला जायच्या.
क्रिकेटप्रेम आणि देशभक्तीही
बाळासाहेबांना पहिल्यापासून क्रिकेटचे वेड. एकदा पुण्यातील कार्यक्रम संपवून मुंबईला जाण्यासाठी निघालेले असताना त्यांच्या लक्षात आले, की आज भारत-पाकिस्तान एकदिवसीय सामना आहे. टीव्ही तेव्हा सार्वत्रिक झालेला नव्हता. त्यामुळे हा सामना पाहायचा कोठे, असा प्रश्न उपस्थित झाला; पण काकांच्या घरी टीव्ही होता. मग त्यांच्या घरी जायचे ठरले. लगेच काकांकडे निरोप गेला, की बाळासाहेब मॅच पाहायला येत आहेत. भराभर घराची आवराआवर झाली. तोवर बाळासाहेब पोहोचलेच. भारतीय संघ त्या दिवशी त्या सामन्यात पराभूत झाला आणि मग बाळासाहेबांचे वेगळेच रूप तिथे उपस्थित असलेल्या सर्वाना बघायला मिळाले. तो पराभव त्यांना चांगलाच झोंबला होता आणि खास ठाकरी शैलीत उपहास करत ‘कशाला यांना पायघडय़ा घालतात’, असा प्रश्न ते सामना पाहणाऱ्या सर्वाना करत होते.
काकांच्या घरी आले, की बाळासाहेब कधीच शिवसेनाप्रमुख नसत. ते आले, की कुटुंबातीलच एखादी ज्येष्ठ व्यक्ती आली आहे असा अनुभव वडके कुटुंबातील सर्वाना येत असे. घरी आल्यानंतर गप्पा, जेवण, कुटुंबातील सर्वाबरोबर संवाद हा बाळासाहेबांचा क्रम कधीच चुकला नाही. बाळासाहेबांचे आणि काकांचे संबंध अगदी जिव्हाळ्याचे होते आणि त्यात कधीच अंतर पडले नाही.
आमचे कुटुंबप्रमुख..
गेल्या पिढीतील ज्या राजकीय नेत्यांनी पुण्याच्या राजकारणावर स्वकर्तृत्वाची छाप उमटवली त्यात शिवसेनेचे नेते (कै.) पांडुरंग सावळाराम ऊर्फ काका वडके यांचे नाव अग्रणी होते.
आणखी वाचा
First published on: 18-11-2012 at 02:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Our family leader