ग्रामीण भागातील व प्रकल्पग्रस्त गावातील लोकांना योग्य उपचार आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ऑरेंजसिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटद्वारे संचालित रामटेकचे योगीराज हॉस्पिटल आणि मौद्याच्या ‘एनटीपीसी’च्या संयुक्त विद्यमाने मौदा तालुक्यातील १२ गावांसाठी ‘आपले आरोग्य आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
मौदा तालुक्यातील बाबदेवला आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त बी.व्ही. गोपाल रेड्डी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ऑरेंजसिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष उदयभास्कर नायर, संचालक डॉ. अनुप मरार, एनटीपीसीच्या मौदा प्रकल्पाचे महाव्यवस्थापक व्ही. थांगपंडियान, डॉ. रंजिता साहू, उपविभागीय अधिकारी गिरीश जोशी, यशवंत गायधने, डॉ. अजित सिंग आदी उपस्थित होते.   
खासगी व सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर आधारित हा उपक्रम आहे. कंपनीचे सामाजिक दायित्व म्हणून एनटीपीसीने या प्रकल्पांतर्गत ही गावे दत्तक घेतली आहेत. या गावांना योगिराज हॉस्पिटलमधून डॉक्टरांची चमू एक दिवसाआड भेट देऊन रुग्णांची तपासणी करणार आहे. रुग्णांना उपचार, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. औषधांचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. दर महिन्यात महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येईल. या प्रकल्पामध्ये कुंभारी, धामणगाव, रहाडी, इसापूर, मौदा, आंजनगाव, नवेगाव, बाबदेव, सावरगाव, खंडाळा, तरसा व हिवरा या गावांचा समावेश आहे.
सरकार ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरवित आहे. यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. यासोबतच ऑरेंज सिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटसारख्या संस्थांनीदेखील जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त बी.व्ही. गोपाल रेड्डी यांनी केले. लोकांच्या आरोग्यासाठी ही एक चळवळ आहे. या उपक्रमांतर्गत गावक ऱ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. वेळेवर चांगल्या आरोग्यसेवा देण्यास कटिबद्ध आहोत, असे ऑरेंजसिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष उदयभास्कर नायर यांनी सांगितले. एनटीपीसीचे हॉस्पिटल सुरू होण्यास दोन वर्ष लागतील. या संयुक्त उपक्रमांतर्गत ९ महिन्याची योजन तयार करण्यात आली आहे. रामटेकच्या रुग्णालयात दोनशे खाटांची व्यवस्था होणार आहे, असे व्ही. थांगपंडियान म्हणाले.
नियमित रोगनिदानासोबतच प्रत्येक महिन्यात एका विषयावर आधारित वेल वुमन कॅम्प, बालरोग निदान, नेत्र तपासणी व अस्थिरोग उपचार शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. आवश्यक औषधे व पॅथॉलॉजीतील तपासणी विनामूल्य करण्यात येणार आहे. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांना तुळशीची रोपटे भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला एनटीपीसीच्या मनुष्यबळ विकास विभागाचे व्यवस्थापक प्रशांत सिंग, सभापती, उपसभापती, परिसरातील गावांतील सरपंच व गावकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. योगिराज हॉस्पिटलचे डॉ. दीपक डोंगरे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. रंजिता साहू यांनी आभार मानले. 

Story img Loader