कारागृहातील वास्तव्यात कैद्यांना काय वाटते? कारागृहातून सुटका झाल्यानंतर बाहेरील लोकांना कोणता संदेश ते देतील, असे सवाल करून येथील भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक  अभिनव कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, तर अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक अशोक जाधव होते. बंदिवानांनी त्यांच्या बोलीभाषेतून शब्दांची जुळवाजुळव करीत भावना व्यक्त केल्या. कोणतीही भीती न बाळगता अनेक बंदिवानांनी सांगितले की, त्यांच्यापैकी सुमारे ९० टक्के बंदी निरपराध म्हणून सुटतात. परंतु, त्यांना न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कारागृहात ८ ते १० वर्षे घालवावी लागतात. गुन्हा न करताही कारावासाची शिक्षा भोगावी लागते. येथे केळी, फळे, हलवा, दूध मिळते. पण, पिंजऱ्यातील पोपटाप्रमाणे आमची दशा असते. बाहेरच्या जगाशी संबंध तुटलेले असतात. जग काय म्हणेल, याचीही चिंता असते. कारागृहात तरुण बंदिवानांची संख्या जास्त आहे.  एक महिला  बंदी  म्हणाली,  येथे शाळेसारखे वाटते. कार्यक्रमांमुळे नवीन ज्ञान मिळते.  प्रदीर्घ काळ कारागृहात जीवन घालविणारे वयोवृद्ध बंदी म्हणाले, पूर्वीपेक्षा कारागृह खूप सुधारले आहे. आता कारागृह काळकोठडी राहिली नाही. सर्वत्र साफसफाई दिसते.

Story img Loader