काँग्रेस-राष्ट्रवादीतील कुरघोडीनंतर विभागीय कर्करोग रुग्णालयात एवढे दिवस केवळ बाह्य़ विभागातच रुग्णांची तपासणी होत असे. रुग्ण दाखल करून घेतल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी आवश्यक शस्त्रक्रिया विभाग पुढील आठवडय़ात कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. नुकतेच रुग्णालयातील एका शस्त्रक्रिया विभागाचे र्निजतुकीकरण करण्यात आले. त्याचा अहवाल आल्यानंतर हा विभाग सुरू होईल, असे रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनानंतर विभागीय कर्करोग रुग्णालयासाठी आवश्यक तो निधी स्वतंत्र खात्यावर मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर ते मार्च या कालावधीसाठी ७ कोटींची गरज असल्याचे कर्करोग रुग्णालयाने घाटी प्रशासनास कळविले आहे. यातील ३ कोटी औषधांसाठी वापरले जाणार आहेत. रुग्णांना दाखल करून घेणे सुरू झाले असले, तरी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी उभारलेले ८ केंद्रांचे शस्त्रक्रिया संकुल अजून सुरू झाले नाही. संकुलातील ८ शस्त्रक्रिया केंद्रांपैकी १ केंद्र पुढील आठवडय़ात सुरू होण्याची शक्यता आहे. निर्जंतुकीकरण केल्यानंतर त्याचे अहवाल ८ ते १० दिवसांत मिळतात. पहिल्यांदाच शस्त्रक्रिया केंद्र सुरू होत असल्याने निर्जंतुकीकरणासाठी ३ वेळा नमुन्यांची तपासणी केली जाते. त्याचे अहवाल मायक्रोबायलॉजी विभागाकडून आल्यानंतर हे केंद्र सुरू होणार आहे. जसजशी रुग्णांची संख्या वाढत जाईल, तसतसे कामही प्रगतिपथावर जाईल, असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी ३५ जणांना राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ देता येऊ शकणार आहे. पाठविलेल्या प्रस्तावांपैकी दोन रुग्णांची देयके मंजूर होऊन ती रक्कम जमा झाली, तर अन्य १०जणांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू असले, तरी राजीव गांधी योजनेतील रुग्णांना औषधे मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
कॅन्सर रुग्णालयातील आठपैकी एक शस्त्रक्रिया विभाग सुरू होणार
काँग्रेस-राष्ट्रवादीतील कुरघोडीनंतर विभागीय कर्करोग रुग्णालयात एवढे दिवस केवळ बाह्य़ विभागातच रुग्णांची तपासणी होत असे. रुग्ण दाखल करून घेतल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी आवश्यक शस्त्रक्रिया विभाग पुढील आठवडय़ात कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
First published on: 11-12-2012 at 12:34 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Out of eight one section will start for surgery in cancer hospital