ऊसदराच्या आंदोलनादरम्यान, पोलिसांनी विनाकारण त्रास देत केलेला छळ अजूनही कायम असल्याने मुजोर पोलिसांच्या निषेधार्थ येत्या १५ डिसेंबरला सातारा पोलीस मुख्यालयावर आक्रोश मोर्चा नेणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत उपस्थित होते.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील दवाखान्यातून जेलमध्ये दाखल आहेत. शरीर साथ देत नसताना मोठे योगदान देणारे पंजाबराव या आंदोलनाचे सरसेनापती आहेत. ऊसदरवाढीच्या दुसऱ्या लढय़ातील स्वातंत्र्यसैनिक म्हणून सध्या अटकेत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा जंगी गौरव करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले. उसाची पहिली उचल २,६५० रुपये एकरकमी मिळण्याच्या मागणीवर संघटना ठाम आहे. हमीदवाडय़ाचा पहिला हप्ताही २,६५० रुपयांचाच राहणार आहे. त्यास फाटा दिल्यास सदाशिव मंडलिकांना भीक लागल्याचे म्हणावे लागेल. आपण ऊसदराची कोठेही तडजोड केली नसल्याचा निर्वाळा शेट्टी यांनी दिला.
मंत्रिगटाच्या कालच्या धोरणाबाबत आपण पूर्णत: समाधानी नाही परंतु, मंत्रिगटाच्या शिफारशी तसेच, राज्य शासनाने पर्चेस टॅक्स माफी देत मळीवरील बंदी उठवावी. केंद्राने निर्यातबंदी उठवून साखरेच्या निर्यातीला चालना दिल्यास उसाला अपेक्षेप्रमाणे हमीदर मिळण्यास हरकत नसल्याचा विश्वास त्यांनी दिला. एफआरपीपेक्षा कमी ऊसदर देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची आमची कायदेशीर मागणी असून, कोटय़ावधींचा ऊसदर कमी देणाऱ्या कारखान्यांना केवळ २५ हजारांचा दंड हा न्याय हस्यास्पद असल्याची टीका त्यांनी केली.
ऊसदरवाढीच्या आंदोलनावर शासन व पोलिसांचा राग का? असा सवाल करून साखर कारखानदारांनी ऊसाला न्याय हमीभाव द्यावा. शेतकऱ्याची पिळवणूक करू नये हीच आमची भूमिका आहे. मात्र, शांततेत आंदोलन करणाऱ्या ऊसउत्पादकाला पोलिसांनी विनाकारण त्रास दिला. अक्षरश: छळ केला. हे घडत असताना, मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा डोळय़ाला पट्टी लावून बसले होते का? की, शासनाच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी शेतकऱ्यांवर अमानुष अत्याचार केला असा संताप त्यांनी व्यक्त केला. पोलीस बळाच्या दडपशाहीविरुद्ध आता संघर्षांची भूमिका घेणार असून, अटक करण्यात आलेल्या ऊसउत्पादकांना निर्दोष करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. सातारा जिल्ह्यात कायद्याचे राज्य नसून, गुन्हय़ांचे प्रमाण वाढले आहे. बेकायदा धंद्यांचा उच्छाद झाला आहे. राज्यकर्त्यांचे पोलीस प्यादी आहेत. त्यांनी आता शहाणपणाने वागावे, अन्यथा त्यांनाही शिंगावर घेऊ. दोन-चार दिवस संयमाने घेऊ, पोलिसांनी अत्याचार न थांबवल्यास हिसका दाखवू, असाही इशारा त्यांनी दिला. आंदोलन स्थळावरून आपण पाचवडफाटा येथे रस्त्यावर जाऊन शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले नसते तर पोलिसांचे काय झाले असते? असा सवाल त्यांनी केला. आपले आंदोलन चुकीच्या मार्गाने झाले. साखर आयुक्त व साखर कारखानदारांच्या कार्यालयावर आंदोलन करण्याची आपली हिंमत नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमधूनच व्यक्त होत असल्याबाबत विचारले असता, आंदोलनाचा निर्णय नेत्यांना असतो असे मान्य करीत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
बैठकीच्या सरतेशेवटी आंदोलनाला कराडमधील व्यापारी, सर्वसामान्यांनी पाठिंबा दिला. माध्यमांनी बळीराजाची कैफियत आक्रमकपणे मांडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, सध्या माझ्याकडे आभार मानण्यापलिकडे काही नाही परंतु, लवकरच काहीतरी देण्याची ताकद येईल असे नमूद करताच ‘तशी वाटचाल सुरू आहे का,’ या प्रश्नावर शेट्टींसह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
राज्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी अत्याचार केला का? – राजू शेट्टी
ऊसदराच्या आंदोलनादरम्यान, पोलिसांनी विनाकारण त्रास देत केलेला छळ अजूनही कायम असल्याने मुजोर पोलिसांच्या निषेधार्थ येत्या १५ डिसेंबरला सातारा पोलीस मुख्यालयावर आक्रोश मोर्चा नेणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-12-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Outrage to police should asked government leader raju shetty