आपल्यावर अन्याय, अत्याचार होऊ नये म्हणून महिलांनी शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्टय़ा सक्षम होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री शकुंतला वाघ यांनी केले.ं भाऊसाहेबनगर येथील क. का. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान ,संगणक विज्ञान महाविद्यालय, पुणे विद्यापीठ प्रौढ निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभाग अंतर्गत महिला सबलीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
महिलांना स्वत:चे संरक्षण स्वत: करण्यासाठी सर्वच क्षेत्रांमध्ये सक्षम होणे आवश्यक आहे. पालकांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा मुलींनी गैरफायदा घेऊ नये. आपल्यावर होणारे संस्कार आणि संस्कृतीचे जतन केल्याशिवाय महिला सबलीकरण होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. समाजसेविका अश्विनी बर्वे यांनी दृष्टी आणि विचार बदलून आपल्या जीवनाचा सर्वागीण विकास साधावा, स्त्री-पुरूष समानता झाल्याशिवाय महिला सबलीकरण होणार नाही, असे मत मांडले.
पिंपळसच्या सरपंच वैशाली ताजणे, सायली दुसाने यांनीही मार्गदर्शन केले. प्रा. स्वाती जाधव यांनी महिला सबलीकरण होण्यासाठी मुलींनी काय करावे याबाबत उपाययोजना सांगितल्या. कार्यशाळेचे समन्वयक प्रा. त्र्यंबक बाभळे यांनी प्रास्तविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. एन. एस. जाधव यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. किरण वाघ यांनी केले. आभार प्रा. भावना पोळ यांनी मानले.

Story img Loader