नाटककार डॉ. विवेक बेळे यांना स्मार्ट आणि बुद्धिगम्य विनोदाची नस अचूक सापडली आहे, हे त्यांच्या ‘नेव्हर माइंड’, ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’, ‘काटकोन त्रिकोण’ आणि नुकतेच व्यावसायिक रंगभूमीवर आलेले ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ या नाटकांतून सप्रमाण सिद्ध झालं आहे. त्यातही गंमत अशी की, आधी समांतर रंगभूमीवर प्रेक्षकपसंतीची ‘चाचणी’ घेऊन नंतरच ते नाटक मुख्य धारेत करण्याचं धोरण त्यांनी पहिल्यापासून अवलंबिलं आहे. मानवी वर्तनातील स्वार्थप्रेरित विसंगती; त्यातही मुख्यत: स्त्री-पुरुष संबंधांतील गुंतागुंत, त्यांतलं चोरटेपण अन् अंतíवरोध आणि त्यापायी संबंधितांना भोगावे लागणारे मानसिक-भावनिक क्लेश, होणारी फरपट हे सगळं विनोदाच्या अवगुंठनातून काटेकोर गणिती पद्धतीनं मांडण्याचं एक भन्नाट तंत्र त्यांना अवगत झालेलं आहे. त्यांच्या या आगळ्या रचनाशैलीमुळे त्यांच्या नाटकांकडे भिन्नवयीन प्रेक्षक सारख्याच ओढीनं आकर्षित होताना दिसतात.
‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ हाही चाळिशीतल्या स्त्री-पुरुषांतील ेसंबंधांकडे सूक्ष्मदर्शकातून पाहण्याचा आणि त्यांचे अवलोकन करण्याचा डॉ. विवेक बेळेंचा एक यशस्वी प्रयत्न आहे. चाळिशीतला माणूस आयुष्यात बहुतांशी स्थिर झालेला असतो. म्हणजे त्याचं लग्नबिग्न होऊन, स्वत:चं घरदार वगैरे थाटून नोकरीतही स्थैर्य आलेलं असतं. पोरंबाळं शाळा-कॉलेजात जायला लागलेली असतात. उराशी बाळगलेली बहुतेक स्वप्नं पुरी झालेली असतात. नवं काही ध्येय समोर असतंच असं नाही. एव्हाना तारुण्यही मागे पडलेलं असतं. त्याची हुरहुर, खंत मनाला सतावत असते. नवरा-बायकोचे संबंधही या वयात सर्वदृष्टय़ा स्थिरावलेले असतात. त्यातली पूर्वीची ओढ उणावलेली असते. हे पुरुषांच्या बाबतीत घडतं तसंच स्त्रीच्या बाबतीतही घडतं. अशावेळी आयुष्यात काहीतरी एक्साइटमेंट असायला हवी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण ‘तशी’ एक्साइटमेंट सगळ्यांच्याच वाटय़ाला येते असं नाही. मग दुसऱ्यांच्या आयुष्यात घडलेल्या, न घडलेल्या लफडय़ांच्या गॉसिपिंगमध्ये ती शोधली जाते. काही सुदैवी जीव प्रत्यक्षात ‘लफडं’ करण्यात यशस्वीही होतात. आणि कमनशिबी त्यांच्या भाग्याची असुया करत गॉसिपिंगमध्ये आपला जीव रमवू पाहतात.
तर.. ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ हा चाळिशीतल्या विवाहित स्त्री-पुरुषांनी आयुष्यात एक्साइटमेंट शोधण्याच्या धडपडीत घडलेल्या कथित नैतिक-अनैतिकतेतील द्वंद्वाचा धम्माल विनोदी पंचनामा आहे. डॉक्टर-सुमित्रा, वरुण-शलाका, पराग-अदिती ही तीन विवाहित जोडपी आणि त्यांचा अविवाहित मित्र अभिषेक एका वीकएन्डला डॉक्टरच्या घरी पार्टीसाठी जमतात. खाणंपिणं, मौजमस्ती करताना अचानक वीज गेल्याने झालेल्या क्षणिक अंधारात कुणीतरी कुणाचंतरी चुंबन घेतं आणि ती स्त्री त्या चुंबन घेणाऱ्याच्या कानशिलात लगावते. परंतु कुणा दोघांत हे घडलं, हे कुणालाच समजत नाही. कारण ज्यांच्यात हे घडतं ते आपण त्या गावचेच नाही अशा तऱ्हेनं गप्प बसतात. परंतु ज्या अर्थी कुणाच्या तरी कानाखाली आवाज काढला गेलेला आहे त्या अर्थी हे कुणा नवरा-बायकोंत घडलेलं नाही, हे नक्की. म्हणजेच कुण्या परक्या पुरुषानं त्या स्त्रीचं चुंबन घेतलेलं असणार! त्यामुळे तो पुरुष आणि ती स्त्री कोण? हा भुंगा सर्वाच्याच मनात घोंघावत राहतो. पण कुणीच कबूल होत नाही. या प्रकरणातील संबंधितांचा शोध लागल्याशिवाय यापुढे पार्टी करायची नाही असं डॉक्टर ठरवतात. पण त्यांच्या बायकोचा- सुमित्राचा त्यास विरोध असतो. त्या माणसाने भावनेच्या भरात हे कृत्य केलं असणार, तेव्हा त्याचा फार बाऊ करण्यात अर्थ नाही असं तिचं म्हणणं असतं. परंतु कदाचित आपलीच बायको वा आपलाच नवरा या कृत्यात सामील नाहीए ना, अशी शंका सर्वाच्याच मनाला टोचत राहते. तिचं निराकरण झाल्याविना त्यांचे संबंध पूर्वीसारखे राहणार नसतात. तेव्हा या गोष्टीचा प्रत्येकजण आपापल्या परीनं तपास सुरू करतो. कुणीएक या तपासासाठी निनावी ब्लॉगच तयार करतो. त्यावर ज्याला कुणाला एखाद्यावर संशय असेल त्याने त्याचं नाव सुचवावं, किंवा ज्याने कुणी ही गोष्ट केली असेल त्याने आपल्या गुन्ह्य़ाची कबुली द्यावी असं आवाहन या ब्लॉगवर केलं जातं.
गंमत म्हणजे प्रत्येकालाच एकमेकांवर संशय असतो. कुणाला आपल्या बायकोचं पार्टीतल्या मित्राशी गुटर्गु सुरू असल्याचा संशय- नव्हे खात्रीच असते, तर कुणाचं आपल्या मित्राच्या बायकोशी, किंवा कुणाचं आपल्या नवऱ्याच्या मित्राशी ‘गुलुगुलू’ चाललेलं असतं. परंतु त्यांना आपण वगळून तिसरंच कुणीतरी या प्रकरणात गुंतलेलं असल्याचा वहीम असतो. एकुणात सर्वाचीच चोरून लफडी चालू असली तरी ‘मी नाही त्यातला/त्यातली, अन्..’ असा सारा मामला असतो. मग यातल्या नेमक्या कुणी कुणाचं चुंबन घेतलं आणि कुणी कुणाच्या कानपटात वाजवली, हाच ‘मिलियन डॉलर’ प्रश्न असतो. त्याच्या उत्तराच्या शोधात प्रत्येकजण आपलं तेवढं झाकण्याच्या नादात हळूहळू कसा उघडा पडत जातो, हे नाटकात पाहायला मिळतं. डॉ. विवेक बेळे यांनी ‘अलिबाबा..’मध्ये एका चुंबनाच्या आधारे चाळिशीतल्या पिढीच्या मानसिकतेचं व तिच्या कथित नीतिमत्तेचं विच्छेदन करत धमाल खिल्ली उडवली आहे. मागील पिढी पापभिरू होती. त्यांना अशी संधीही मिळण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे असले काही मोह जरी त्यांना पडले तरी ते पाप वाटत असल्यानं ते अशा भानगडींच्या वाटेला गेले नाहीत. पुढची पिढी केवळ ‘आज’मध्येच जगत असल्यानं आपल्याला ज्यात सुख मिळतं ते बेलाशक अनुभवण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. त्यामुळे त्यांना मानसिक होरपळीतून जावं लागण्याची शक्यता शून्य! उरली मधली चाळिशीतली पिढी. तिला ना जुनी मूल्यं त्यागता येत, ना धड नव्या युगाचा स्वीकार करून मन मानेल तसं जगता येत. म्हणून मग ही पिढी चोरीछुपके, कुणाला न कळता विवाहबाह्य़ मजा चाखता आली तर चाखू बघते. मात्र नीतिकल्पना आणि पकडले जाण्याचं भय त्यांना सतावत राहतं. त्यामुळे त्यांचे सगळीकडून वांधे होतात. या पिढीचं हे दुखणंच डॉ. बेळे यांनी नाटकात मांडलं आहे. त्यासाठी त्यांनी रचलेला चक्रव्यूह बिनतोड आहे. त्यातून एकेकाचं वस्त्रहरण करत ते मुद्दय़ाला हात घालतात. त्याकरता त्यांनी निर्मिलेली पात्रं त्यांना रसद पुरवतात. त्यातून एक रहस्यरंजक नाटकही आकाराला येतं.
दिग्दर्शक अजित भुरे यांनी नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांच्या साहाय्यानं ही गोची व त्यातले ताणतणाव टोकदारपणे बाहेर काढले आहेत. एकाच वेळी निरनिराळ्या व्यक्तींच्या आयुष्यात काय घडतंय, हे दाखवण्यासाठी प्रदीप मुळ्ये यांनी निर्मिलेला बहुस्थळी सेट याकामी त्यांना उपयोगी पडला आहे. हे नाटक उच्चारित शब्द आणि त्यामागच्या व्यक्त-अव्यक्त भावनांचं, त्यातल्या ताण्याबाण्यांचं आणि सत्य दडपण्यासाठी योजलेल्या क्लृप्त्यांचं आहे याची जाणीव दिग्दर्शकाला आहे. त्यामुळेच पात्रांच्या हालचालींपेक्षा त्यांच्या व्यक्त होण्याकडे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अर्थाच्या छटांकडे त्यांनी बारकाईनं लक्ष पुरवलं आहे. पात्रांच्या वाचिक क्रिया-प्रतिक्रिया तसंच प्रतिक्षिप्त क्रियांना यात अनन्य महत्त्व आहे, हे ओळखून त्यांनी त्यानुसार पात्रांना हाताळलं आहे. हे करताना प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व द्यायलाही ते चुकलेले नाहीत. यातली काही पात्रं बेतीव आहेत हे उघड असलं तरी लेखकानं आपलं गृहीत प्रमेय सिद्ध करण्याकरताच त्यांची योजना केलेली असल्यानं ते ध्यानी घेऊन भुरे यांनी प्रयोग आकारला आहे. पण नाटकातील अॅनिमेटेड पात्रांचा भाग काहीसा ठिगळासारखा वाटतो. नरेंद्र भिडे यांच्या पाश्र्वसंगीतानं नाटकाला प्रसन्नता बहाल केली आहे. शीतल तळपदे यांनी या बहुस्थळी नाटय़ाचं आव्हान प्रकाशयोजनेतून यशस्वीरीत्या पेललेलं आहे.
आनंद इंगळे यांनी यातला मूळचा डरपोक लफडेखोर, त्याकरता साळसूदपणाचा आव आणणारा वरुण झक्कास रंगवला आहे. शब्दांचं वजन, त्यांची फेक, बुद्धिगम्य विनोदाची जाण आणि त्याचं हुकमी उपयोजन, टायमिंग सेन्स या सर्वच गोष्टी साध्य असलेला त्यांच्याइतका उच्च कोटीचा दुसरा कलाकार आज नाही. त्यांची वरकरणी साधीभोळी, परंतु सारं जाणणारी असलेली त्यांची विवेकी पत्नी शलाका- सीमा देशमुख यांनी आवश्यक त्या निरागसतेनं छान साकारली आहे. मंजुषा गोडसे यांनी उच्छृंखल, संभावित वाटावी अशी सुमित्रा तिच्या राखाडी छटेसह उत्तम उभी केली आहे. धनंजय गोरे यांनी साकारलेला नैतिकतेचा पुरस्कर्ता डॉक्टर लक्षवेधी नसला तरी कळीचा माणूस ठरू शकतो, ही शक्यता सतत तेवती ठेवतो. आचार-विचारांपासून सगळ्यातच ‘हायपर’ असणारा पराग- विद्याधर जोशी यांना अचूक सापडला आहे. परागच्या अतिरेकातही कार्यकारणभाव दडलेला असतो. राधिका विद्यासागर यांनी विवाहबाह्य़ संबंधांत वाहवत चाललेली परागची पत्नी अदिती अपराधगंडासह भावस्पर्शी वठवली आहे. अभिषेकच्या भूमिकेत राजन भिसे यांनी अदितीबरोबरच्या संबंधांतली कुतरओढ, ते नाकारण्याचा अट्टहास तसंच तिचा नवरा पराग याच्याबरोबरचे मित्रत्वाचे संबंध टिकवण्याची त्याची धडपड इत्यादी कंगोरे व्यवस्थित दाखविले आहेत. आजच्या चाळिशीतल्या पिढीचं हसतखेळत मनोविश्लेषण आणि मनोविच्छेदन करणारं हे नाटक रंजनाबरोबरच डोळ्यांत अंजनही घालतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा