पट्टेदार वाघाच्या अस्तित्वाने जगाच्या पर्यटन नकाशावर स्थान मिळालेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला गेल्या पाच महिन्यात तब्बल १ लाख २५ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. गेल्या दहा वर्षांतील पर्यटकांचा हा सर्वोच्च आकडा असून प्रवेश शुल्कातून अंदाजे एक कोटीवर आर्थिक उत्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, यावर्षी अतिविशिष्ट पर्यटकांनी हजेरी लावल्याने ताडोबाच्या लोकप्रियतेत भर पडली आहे.
वनसमृध्दीने नटलेल्या चंद्रपूरपासून अवघ्या ४५ कि.मी. अंतरावर पट्टेदार वाघांसाठी केवळ देशातच नव्हे, तर विदेशात प्रसिध्द असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ६२५.०४ चौ.कि.मी क्षेत्रात वसलेला आहे. हा व्याघ्र प्रकल्प म्हणजे मध्य भारतातील निसर्ग, घनदाट अरण्य आणि वाघ, पक्षी, फुलपाखरू व वन्यजीवांचे अव्दितीय आश्रयस्थळ बनले आहे. ताडोबात हमखास वाघांचे साईटिंग होत असल्याने गेल्या दहा वर्षांत या प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. मागील पाच महिन्याचा विचार केला तर ऑक्टोबर ते ३१ मार्च या पाच महिन्याच्या कालावधीत तब्बल १ लाख २५ हजार पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली आहे. यात देशी-विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. याच पाच महिन्यात जवळपास चौदा हजार वाहने प्रकल्पात दाखल झाली. पर्यटक व वाहनांचे प्रवेश शुल्क मिळून अंदाजे एक कोटीवर उत्पन्न प्रकल्पाला झालेले आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत ताडोबात जंगल सफारीसाठी येणाऱ्यांमध्ये अतिविशिष्ट पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली आहे, अशी माहिती आमच्या चंद्रपूरच्या प्रतिनिधीने दिली.
कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी नुकताच सलग पाच दिवस ताडोबात मुक्काम ठोकून जंगल सफारी केली. त्यांना तब्बल अकरा पट्टेदार वाघांनी दर्शन दिले. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, त्यांच्या पत्नी सत्यशीला चव्हाण, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, मनसे नेते राज ठाकरे, शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यासह अनेकांनी या प्रकल्पाला भेट दिलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व दिग्विजय सिंग यांनी चिंतनासाठी ताडोबाची निवड गेल्याने या प्रकल्पाकडे राजकारण्यांचेही लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळेच आता राजकीय पक्षही चिंतनासाठी या प्रकल्पाची निवड करतांना दिसत आहे. विशेष म्हणजे, या सर्वांनाच पट्टेदार वाघाने एकापेक्षा अधिक वेळ दर्शन दिले आहे. अतिविशिष्ट लोक ताडोबात सफारीसाठी येत असल्याने केवळ देशातीलच नाही, तर विदेशातील पर्यटकांचा ओघही ताडोबा प्रकल्पात कमालीचा वाढलेला आहे. उन्हाळ्यात वाघ हमखास दिसत असल्याने आता ताडोबात पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली
आहे.
एकटय़ा मार्च महिन्याचा विचार केला तर जवळपास २५ हजारावर पर्यटकांनी प्रकल्पाला भेट दिली आहे. एका महिन्यात एवढय़ा मोठय़ा संख्येने पर्यटक येण्याची ही पहिलीच वेळ आहे. पर्यटकांकडून वाघ व इतर वन्यप्राण्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून विशेष प्रकल्प व्यवस्थापनाच्या वतीने विशेष काळजी घेतली जात आहे. उन्हाळ्यात वाघांना सहज पाणी मिळावे म्हणून कृत्रिम बंधारे बांधण्यात आले असून तीन टॅंकरव्दारे पाणी सोडण्यात येत आहे. यासोबतच तीव्र उन्हामुळे वणवे लागू नये म्हणून वनविकास महामंडळ व वनखात्याने संयुक्तपणे कामाला सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम यावर्षी केवळ आगीच्या दोन घटना घडलेल्या आहेत. पर्यटकांचा असाच ओघ राहिला तर यावर्षी सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिलेला राज्यातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ताडोबा राहील, अशी माहिती ताडोबा प्रकल्पाचे (कोअर) उपवनसंरक्षक सुजय डोडल यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. सध्या सर्व गोष्टी जुळून आल्यानेच ताडोबाने पर्यटनात आघाडी घेतली असल्याचेही ते म्हणाले.
पाच महिन्यांत सव्वा लाख पर्यटक, १ कोटीवर उत्पन्न
पट्टेदार वाघाच्या अस्तित्वाने जगाच्या पर्यटन नकाशावर स्थान मिळालेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला गेल्या पाच महिन्यात तब्बल १ लाख २५ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. गेल्या दहा वर्षांतील पर्यटकांचा हा सर्वोच्च आकडा असून प्रवेश शुल्कातून अंदाजे एक कोटीवर आर्थिक उत्पन्न झाले आहे.
First published on: 05-04-2013 at 03:59 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over lakhs of tourist in five months more than one carod income