पळून जात असलेल्या लुटारूंना थोपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नंदनवन पोलीस व जरीपटका पोलिसांवर दोन शस्त्रधारी लुटारूंनी गोळीबार केला. गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रभर या लुटारूंचा पाठलाग केला. शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करूनही लुटारू सकाळी दहा वाजता दक्षिण नागपुरातील बाबुळखेडा परिसरातून गुंगारा देण्यात यशस्वी झाले.
उंटखानामध्ये सायंकाळच्या सुमारास एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर गोळीबाराची घटना घडली. त्यानंतर शहरात पोलीस सक्रिय होत असतानाच रात्री सव्वाअकरा वाजताच्या सुमारास तिघांनी मोटारसायकल हिसकावली. सचिन रमेश पिंपळे (रा. खरबी रोड) हा त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी मोटारसायकलने (एमएच/३२/एन/३५९४) घरमालकासह जात होता. नंदनवन झोपडपट्टीसमोर त्यांना तिघांनी अडविले. बंदुकीचा धाक दाखवून ‘गाडी दो नही तो गोलीसे मार दुंगा’ असा दम देत मोटारसायकल हिस कावून ते जगनाडे चौकाकडे पळाले. जगनाडे चौकाजवळ नंदनवन झोपडपट्टीसमोरील सिमेंट रोडवर नंदनवन पोलीस ठाण्याचे हवालदार बट्टुलाल पांडे यांच्यासह पथक नाकाबंदी करीत होते. मोईन अंसारी (रा. मांजरी नाका), राजा गौस व आणखी एक, असे तिघे जवळ आले. त्यांना बट्टुलाल यांनी ओळखले आणि थांबण्याचा इशारा केला. पोलीस दिसताच या तीन आरोपी लुटारूंनी गोळीबार सुरू केला. अचानक झालेल्या या गोळीबाराने पोलीस भांबावले. पोलिसांनी लगेचच सजग होत त्यांना प्रत्युत्तर दिले. ही चकमक सुरू असताना रस्त्याने ऑटो रिक्षा जात होता. त्यावरही गोळीबार झाला. चालक व प्रवासी पळून गेले. ऑटो रिक्षाच्या काचेचा चुराडा झाला. त्यानंतर पोलीस पथक धाडसाने लुटारूंना पकडण्यासाठी धावले आणि तिघांना पकडले. तेथे झटापट झाली. यावेळी गोळीबारात प्रकाश वानखेडे याच्या हाताला गोळी लागली. इतर पोलीस किरकोळ जखमी झाले. त्यामुळे दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. गोळीबाराच्या आवाजाने या परिसरात लोक दचकले आणि घराबाहेर पडले.
गंगाबाई घाट चौकात मोटारसायकल बंद पडली. पेट्रोल संपल्याचे आरोपींना वाटते. त्यांनी तेथून जात असलेल्या अतुल मनोहर राघोते (रा. नंदनवन झोपडपट्टी) व अजय खोब्रागडे या दोघांना थांबवून पेट्रोल मागितले. त्या दोघांनी नकार दिल्याने त्यांची देशी कट्टय़ाचा धाक दाखवून सीबीझेड मोटरसायकल (एमएच/४०/झेड/७५३२) हिसकावून पळून गेले. सोबतची मोटारसायकल (काही वेळापूर्वी लुटलेली) सोडून दिली. या घटनांमुळे शहर पोलीस
हादरले. पोलिसांनी शहरात नाकाबंदी सुरू केली होती. पोलीस आयुक्त कौशल पांडे, सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, अनंत शिंदे व श्रीकांत तरवडे हे अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेचे प्रमुख उपायुक्त सुनील कोल्हे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण शहरात पोलिसांना कामी लावण्यात आले.
पोलीस निरीक्षक माधव गिरी यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथकाने हल्लेखोरांचा पाठलाग सुरू केला. पारडी, मानकापूर, टेका नाका, जरीपटका भागात आरोपी पळत होते. गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या मागावर होते. ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळ सकाळी सात वाजताच्या सुमारास नाकाबंदी सुरू होती. तेथे पोलिसांच्या दिशेने गोळीबार करीत ते पळाले. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास लुटारू दक्षिण नागपुरातील अभयनगरजवळ होते. तेथे गुन्हे शाखेच्या पथकाला दोघे लुटारू दिसले. तेथून ते पळाले बाबुळखेडाजवळ आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले. सकाळी दहा वाजता बाबुळखेडा हे आरोपींचे शेवटचे ‘लोकेशन’ होते. या ठिकाणी चार रिव्हॉल्वर व देशी कट्टे सापडल्याने कुख्यात आरोपी राजा गौसची टोळी शस्त्रांच्या तस्करीत असल्याचे उघड झाले. जगनाडे चौकाजवळ एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला. तो जखमी असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंदनवन पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा तसेच शस्त्र काद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा