इंग्लिश इज इझि! हे प्रा. शरद पाटील लिखित पुस्तक आपल्या सर्वासाठीच फार तळमळीनं, नेमकी आपली अडचण आणि इंग्रजीची उपयुक्तता जाणून लिहिलं गेलं आहे. त्यात कुठंही इंग्रजीचं अवडंबर माजवणं हा प्रकार नाही. खोलात विचार केला तर इंग्रजी आपल्यासाठी परकीय भाषा राहिलेली नाही. ती केव्हाच अभिजनांची भाषा झाली आहे. त्यामुळे कामकाजापुरता तरी इंग्रजी बोलता यावी, अशी लेखकाची अपेक्षा रास्त आहे. ती शिकणं किती सोपं आहे त्यावर त्यांनी दैनिक भास्करमधून लेख लिहिले. पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाला इंग्रजी शिकवायची नाही, तर तिच्याविषयी असलेली भीती किंवा न शिकण्याची कारणं घालवायची आहेत.
संभाषणाची भाषा शिकवावी लागते यावर लेखकाचा अजिबात विश्वास नाही. तेही एकार्थी खरंच आहे. आपण कुठं हिंदीचे वर्ग लावून हिंदी बोलायला शिकलो. इंग्रजी बोलणं ही आपली मानसिक समस्या आहे. सुरुवातीला चुका होतीलच, हे गृहित धरूनच ती बोलायला हवी. सरावानं बोलण्यात आत्मविश्वास वाढायला मदत होते. इंग्रजीचं व्याकरण न येणं, शब्दच माहिती नसणं, भवताल इंग्रजी बोलणारी माणसं उपलब्ध नसणं, अशी अनेक गाऱ्हाणी असतात आणि सरतेशेवटी कोणी हसलं तर काय, हे मानसिक दडपणही असतं. शाळेत इंग्रजी माध्यम नव्हतं, हा तर आणखी एक बागुलबुवा उभा केला जातो. या सर्व कारणांवर लेखकानं उपाय सुचवले आहेत. आपली मातृभाषा व्याकरण न शिकताच शब्द कानावर आदळल्यावर आपण जशी शिकतो तशीच इंग्रजीही शिकायची. भाषा शिकणं ही मानसिक प्रक्रिया आहे शैक्षणिक नाही. निदान इंग्रजी शिकण्याच्या प्राथमिक पायरीवर तरी ते मान्य करायला हवं.
इंग्रजी वाचता येणं किंवा ती ऐकणं ही प्रक्रिया अजिबात अवघड नाही. आवडीची गोष्टीची पुस्तकं , आवडता पेपर, आवडतं नियतकालीक यापैकी काहीही वाचनासाठी दिवसातून एक अर्धा तास निश्चितच मिळू शकतो. तेच ऐकण्याच्या आणि लिहिण्याच्या बाबतीत करायचं आहे. सुरुवातीचे आठेक दिवस अडचण जाईल, मात्र नंतर आपलं आपल्यालाच उमजू लागेल, असा लेखकाचा ठाम विश्वास आहे. वाचन, ऐकणं आणि लिहिणं या बाबी आपण घरात, एकांतात करू शकतो. त्या क्रियांसाठी जोडीदाराची अजिबात गरज नाही. फक्त इच्छाशक्ती हवी. लेखकानं या सर्व बाबींचा विचार करून इंग्रजी शिकण्यासाठी आवश्यक सर्व मुद्दय़ांवर पुस्तकातून ऊहापोह केला आहे. त्यात ‘लेट युअर बॉडी स्पिक, माईंड युअर टोन, सपोर्टिग फॅक्टर्स, दी सिम्पिसिटी ऑफ वर्ल्डस्, आर्टिकल्स अ अॅण्ड अॅन, लाँग अॅण्ड शॉर्ट प्रोनाउंसिएशन्स, दी सिक्रेट ऑफ फ्लुएन्सी आणि पॉलिश युअर स्पिच इत्यादी’ महत्त्वपूर्ण आणि सर्वाच्या उपयोगी पडेल, अशा लेखांचा समावेश आहे. सोबतच प्रा. शशिकांत सप्रे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांमुळे वाचता वाचता चांगलं मनोरंजन होतं. हे सर्व पहिल्या भागात सामावलेलं आहे. भाग दोनमध्ये व्यक्तिमत्त्व विकास, व्यक्तिमत्त्व विकासात संभाषणाची भूमिका, प्रभावित करणारी मुलाखत कशी द्यावी आणि वेळेचं व्यवस्थापन इत्यादीविषयी सुंदर माहिती दिली आहे. त्यातच ‘बी पॉझिटिव्ह’(हा रक्तगट नाही) होणंही सुचवलं आहे. नागपूरच्या कार्तिक प्रकाशननं प्रकाशित केलेलं हे पुस्तक इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरणारं आहे. अधिक माहितीसाठी गायकवाड-पाटील संस्था समूहाचे अध्यक्ष शरद पाटील यांच्याशी ९०११०७५१८१ या क्रमांकावर संपर्क साधावा. किंमत २२० रुपये आहे.
पालक आणि विद्यार्थ्यांचंही उद्बोधन
वेगवेगळ्या पिढय़ातील कुमार वयातील विद्यार्थ्यांच्या अडचणी जशा वेगवेगळ्या आहेत तशाच त्यांच्या मानसिक समस्यांमध्येही अंतर आहे. तेव्हा प्रसारमाध्यमांचा जीवनातील प्रवेश एवढा फोफावला नव्हता, खाजगी शिकवणी वर्गाना पेव फुटले नव्हते की, सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली बाराही महिने ढोल बडवले जात नव्हते. आपल्याच चार भिंतींच्या आत अभ्यास केला पाहिज,े असे प्रतिष्ठेचे प्रश्नही तेव्हाच्या एकत्र कुटुंब पद्धतीत नव्हते. आजच्या समस्या बऱ्याच वेगळ्या आणि गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. यावर नेमकेपणानं राजा आकाश यांनी पालक आणि विद्यार्थ्यांचं उद्बोधन केलं आहे. शाळेतील अनुपस्थिती, ध्येयाविना शिक्षण, वर्गात लक्ष न लागणं, अभ्यासातील अनियमितता आणि परीक्षेच्या पूर्वतयारीचा अभाव, अशा काही कारणांमध्ये विद्यार्थ्यांच्या अपयशाची कारणं दडली असल्याचं राजा आकाश यांना वाटतं, मात्र ही कारणं केवळ पांढरपेशा वर्गातील विद्याथ्यार्ंची मुख्यत्वे आहेत. घरात अभ्यासासाठी जागाच नसणं, वीज नसणं, दारू पिऊन वडिलांनी रोज रात्री घरात गोंधळ घालणं, आईवडिलांची व कुटुंबातील इतरांची सततची किरकिर असणं, ही कारणंही विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पाडणारी आहेत. शालेय मुलांमध्ये मायग्रेनचं प्रमाण वाढणं हे त्याचंच लक्षण होय. आश्रमशाळेत आज लाखोच्या संख्येनं विद्यार्थी शिकतात. त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ, रात्री अभ्यास करताना एखाद्या विद्यार्थिनीला आश्रमशाळेतील असुविधेमुळे लघुशंकेसाठी बाहेर जाणं शक्य नसणं हे देखील कारण अभ्यासाच्या आड येऊ शकतं.
हल्ली वाढत चाललेल्या मुलांच्या लैंगिक शोषणांमुळे मुलं सतत दबावात असतात. कारण, घरातीलच वडील, भाऊ, मामा, काका या मुलांचं खास करून मुलींचं शोषण करतात. या भेदरलेल्या मानसिकतेत मुलं अभ्यास कशी करणार? अशा अनेक अंतर्गत आणि बाह्य़ अडचणी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला खीळ घालतात. अर्थात, ज्यांना अभ्यास करूनच यशस्वी व्हायचं त्यांना राजा आकाश यांनी पुस्तकात दिलेली उपयुक्त माहिती उपयोगी ठरेल, मात्र ज्यांना कॉपी करूनच उत्तीर्ण व्हायचं त्यांना याचा काय उपयोग? कॉपीची मानसिकता ही देखील समस्याच आहे. प्रामाणिक शिक्षकांना कॉपी खुपते, कारण परीक्षा केंद्राच्या बाहेर पाच पाच पोती कॉपी गोळा केल्याचा अनेक शिक्षकांचा अनुभव आहे. यावर तोडगा काय? तरी पुस्तकातील डेटा मेंदूत कसा डाऊनलोड करायचा, मेंदूचं सामथ्र्य कसं वाढवायचं या पद्धती ‘प्रगती फास्ट..अभ्यासाची’ या पुस्तकातून दिल्या असून त्यातील तंत्रामुळे अभ्यासात गोडी निर्माण करता येते, कमी वेळेत जास्त चांगला अभ्यास करता येतो, परीक्षेची भीती घालवता येते, परीक्षा देण्याचा आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवता येते, असा लेखकाचा दावा आहे. याचा निश्चितच पालकांनी व विद्यार्थ्यांनी विचार करावा. एकमात्र खरं, लेखकानं स्वत:च्या मर्यादा स्पष्ट करून पालक व विद्यार्थ्यांच्या क्षमता, सवयी, प्रेरणा, स्मरणशक्ती यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला असून परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दैववाद, नशीब किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा प्रभाव न दाखवता ‘अत्त दिप भव’ची शिकवण पुस्तकातून दिली आहे. अधिक माहितीसाठी लेखकाशी ९८८११०७०९० या क्रमांकावर संपर्क साधता येईल. पुस्तकाची किंमत २२५ रुपये आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा