अतिअवजड वाहने आणि अन्य मालवाहू वाहनांची भर शहरातून होणारी वाढती वाहतूक नागरिकांचा जीव धोक्यात टाकत असताना प्रादेशिक परिवहन विभाग प्रमुख आणि अधिकारी मात्र काणाडोळा करीत आहेत. भर गर्दीच्या रस्त्यांवर असे ट्रक्स मोठय़ा संख्येने पाहण्यास मिळत असताना शहराचे वाहतूक विभागाचे अधिकारी डोळे बंद करून स्वस्थ बसले आहे. या वाहनचालकांविरुद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही. याविरुद्ध नागरिकांच्या मोठय़ा प्रमाणात तक्रारी असताना नागरिकांचे दूरध्वनी उचलले जात नसल्याच्या मोठय़ा प्रमाणावर तक्रारी येत असून यामागे मोठे ‘अर्थ’कारण दडल्याची शंका येऊ लागली आहे.
ओव्हरलोडेड ट्रक्स तसेच मालवाहू वाहनांची नाक्यावर तपासणी अनिवार्य आहे. अशी वाहने शहरात शिरू नयेत म्हणून गस्ती पथके सतर्क राहण्याची अपेक्षा असताना असे घडताना दिसत नाही. उलट या पथकातील कर्मचारी प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात घुटमळताना दिसतात. रात्रीच्या वेळी अशा ओव्हेरलोडेड वाहनांचे येणे-जाणे आता नित्याचे झाले असून नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत वाहनांना शहरात शिरण्याची परवानगी कशी दिली जाते हा कळीचा मुद्दा आहे. मालवाहू वाहनात भरलेल्या मालावरील कर चुकवून ती शहरात आणली जात असताना कर्मचारी मात्र जागेवर नसतात, अशी स्थिती आहे. त्यामुळे बेकायदा प्रवेश करणाऱ्या वाहनांना रान मोकळे मिळाले आहे.
कागदोपत्री आकडेवारी काढल्यास आरटीओ अधिकारी काही ट्रक चालकांवर कारवाई केल्याचे दाखवून वेळ मारून नेतात. परंतु, नागपूर शहर आणि परिसरातील शेकडो ओव्हरलोडेड ट्रक्सच्या बेकायदा घुसखोरीकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. बुटीबोरी, एमआयडीसी, पारडी, कामठी रोड आणि सावनेर भागात ही संख्या अधिक आहे.
आरटीओ विभागाला बुटीबोरी ते एमआयडीसी या परिसरातील ओव्हरलोडेड ट्रक्सच्या घुसखोरीचे पुरावे देऊनही त्यांच्यावरील कारवाई शून्य आहे. एका ब्रोकरने दिलेल्या माहितीनुसार आरटीओ अधिकाऱ्यांचे गस्तीपथक असलेल्या ठिकाणाजवळून असे ओव्हरलोडेड ट्रक जाताना दिसतात. असे ट्रक जप्त करण्याऐवजी फक्त मेमो बजावून ट्रक सोडून दिले जातात.
याप्रकरणी ‘अर्थ’ कारणाने आरटीओने स्वीकारलेल्या मवाळ धोरणामुळे शहरात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अतिअवजड वाहनांचा शहरात शिरकाव
अतिअवजड वाहने आणि अन्य मालवाहू वाहनांची भर शहरातून होणारी वाढती वाहतूक नागरिकांचा जीव धोक्यात टाकत असताना प्रादेशिक परिवहन विभाग प्रमुख आणि अधिकारी मात्र काणाडोळा करीत आहेत.
First published on: 03-05-2013 at 02:55 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Overloaded heavy vehicles entered in the city