शारदा भवन शिक्षण संस्थेवरील मांड पक्की केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता धर्माबाद शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे. दिवाळी दरम्यान त्यांनी या संस्थेच्या अनेक सभासदांना नांदेड येथे चहापानासाठी आमंत्रित करून निवडणुकपूर्व चाचपणी केली.
या संस्थेच्या विद्यमान कार्यकारी मंडळाची मुदत संपून बराच कालावधी उलटला आहे. मधल्या काळात अध्यक्ष विरुद्ध इतर संचालक अशी विभागणी झाली होती. विठ्ठल पडगीलवार यांच्या निधनानंतर संस्थेच्या सचिवपदी विश्वनाथ बन्नाळीकर यांची नियुक्ती करावी, अशी मागणी बहुसंख्य संचालकांनी केली होती. पण चव्हाण यांनी बन्नाळीकरांवर अविश्वास दाखवत मुलचंद पांडे यांना सचिवपदी नियुक्त केले.
आता निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण निर्मितीचा एक भाग म्हणून चव्हाण यांनी स्वत: तसेच आपल्या काही किटवर्तीयांच्या माध्यमातून स्थानिक तसेच बाहेरच्या सभासदांशी संवाद सुरू केल्याचे सांगण्यात येत असतानाच शहरातील सुप्रसिद्ध डॉ. कमलकिशोर काकाणी यांनी संस्थेच्या सचिवपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
डॉ. काकाणी आधी शिवसेनेत होते. मग ‘राष्ट्रवादी’सोबत गेले. या संस्थेत त्यांचा प्रवेश स्थानिक पातळीवर प्रभावशाली असलेल्या गटाच्या माध्यमातून झाला. त्यांच्या घरात दोघांना संस्थेचे सभासदत्व मिळाले. धर्माबादमधील बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन आता डॉ. काकाणी चव्हाण गटाच्या बाजूने झुकले असून त्यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे अनेक जण अचंबित झाले आहेत.
मोठी परंपरा असलेल्या या संस्थेच्या सभासदांची संख्या फक्त ७३ असून त्यापैकी काही जण बाहेरगावचे आहेत. काही पुस्तक पुरवठादारांनाही जुन्या काळात सभासद करून घेण्यात आले. या महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून या प्रक्रियेत ‘शारदा भवन’च्या एका कर्मचाऱ्याला नियुक्त करण्याचा निर्णय नुकताच झाला.
दरम्यान, ही निवडणूक प्रक्रिया सामोपचाराने पार पाडायची असेल तर सचिवपदासाठी विश्वनाथ बन्नाळीकर यांचा विचार झाला पाहिजे, अशी भूमिका एका गटाने पुढे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा