अमळनेर तालुक्यातील तापी नदीवरील पाडळसरे धरणाचे रखडलेले काम शनिवारपासून पुन्हा सुरू झाले आहे.
जळगाव आणि धुळे जिल्ह्य़ास वरदान ठरणाऱ्या पाडळसरे धरणाचे काम निधीअभावी वर्षभरापासून बंद होते. अपूर्ण अवस्थेतील धरणाचे काम मार्गी लागावे म्हणून आ. साहेबराव पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. धरणासाठी ४० कोटीचा निधी मंजूर झाल्याने जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या उपस्थितीत धरणाच्या कामास शनिवारपासून पुन्हा सुरूवात करण्यात आली.
 मार्चपर्यंत हे काम पूर्ण होण्याची चिन्हे असून काम पूर्ण झाल्यास धरणातील पाण्याची पातळी दोन मीटपर्यंत वाढू शकेल. या धरणातील पाण्याचा फुगवटा ३० किलोमीटपर्यंतच्या गावापर्यंत जाईल असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले. काम पूर्ण झाल्यावर अमळनेरसह अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.
धरणाच्या कामासाठी ११०० कोटी रुपये खर्च दिसत असला तरी त्यातील ४०० कोटी प्रत्यक्ष धरणासाठी तर उर्वरित ७०० कोटी भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी लागणार आहेत, अशी माहिती आ. पाटील यानी दिली. पाडळसरे धरणावर आजपर्यंत ३५० कोटी रुपये खर्च झाला असून धरणावर ९५ कोटी, व्दारावर ५८ कोटी तर ६६ कोटी रुपये भूसंपादनावर खर्च झालेले असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षीच्या अंदाज पत्रकात पाडळसरे धरणासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील फक्त चारच कोटी रुपये अद्यापपर्यंत खर्च झालेले असून ३६ कोटी रुपयात धरणाचे दोन मीटपर्यंत काम पूर्ण होणार आहे.
धरणाचे काम मार्गी लागले असले तरी अमळनेरमधील अतिक्रमणच्या प्रश्नाबाबत आपण उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा