देशाच्या राजधानीत महाराष्ट्राची शान वाढविणाऱ्या ‘महाराष्ट्र सदन’चे मंगळवारी उद्घाटन झाल्यानंतर सदनात ठिकठिकाणी लावण्यात आलेली महाराष्ट्राचे ऐतिहासीक, सांस्कृतिक दर्शन घडविणारी चित्रे सर्वाच्या कौतुकास पात्र ठरली. ही चित्रे नाशिकचे युवा चित्रकार शिशिर शिंदे यांनी चितारली आहेत.
या भव्य-दिव्य अशा वास्तूमध्ये महाराष्ट्राचे चित्ररुपीदर्शन घडविताना महाराष्ट्राचा सर्वागीण विचार करणे गरजेचे होते. चित्रकार शिंदे यांनी या सर्वाचा योग्य अभ्यास केल्यामुळेच महाराष्ट्राची संस्कृती, सण, उत्सव, पौराणिक, ऐतिहासिक स्थळे, महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचे प्रसंग, महाराष्ट्रातील थोर व्यक्तीमत्व या सर्वाच्या चित्रकलाकृती तयार होऊ शकल्या. शिंदे यांनी महाराष्ट्र सदनासाठी चित्रकलाकृती तयार करण्याचे काम २००८ पासून सुरू
केले होते. या सदनाचे भूमिपूजन झाल्यानंतर शिंदे यांनी स्वत: खा. समीर भुजबळ यांच्याशी संपर्क साधत आपल्या राज्याची माहिती स्पष्ट करणाऱ्या चित्रकृती या सदनासाठी तयार करण्याची संधी आपणास मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. खा. भुजबळ यांनी त्यास संधी देत त्याअनुषंगाने सर्व प्रकारची मदतही केली. शिशिरनेही महाराष्ट्रावर आधारित पुस्तके, महाराष्ट्राची सखोल माहिती इंटरनेटच्या माध्यमातून तर काही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन जमा केली. छायाचित्रे मिळविली. त्यामुळे चित्रकलाकृती करणे सोपे झाले. एकूण २०० चित्रे काढण्यात आल्यावर त्यापैकी १५० चित्रांची निवड करण्यात आली. सदर चित्रे ही तैल रंगांच्या माध्यमातून कॅनव्हॉसवर रेखाटण्यात आली आहेत. या कलाकृतींनी सदनाची शान वाढविली असून त्यांना अलंकारिक पद्धतीच्या चौकटीमध्ये सजविण्यात आले आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सर्वानी या चित्रकृतींचे कौतुक केले. चित्रकृती तयार करण्याच्या कामात आपणांस खा. भुजबळ आणि आ. जयंत जाधव यांचे मार्गदर्शन मिळत गेले, असे शिंदे यांनी नमूद केले आहे.

Story img Loader