लग्न सोहळा व तत्सम कार्यक्रमात आपली वेगळीच छाप सोडणाऱ्या पैठणीची कक्षा अधिक विस्तृत करण्याची धडपड येवल्यातील महिला विणकरांनी आणि काही कारागिरांनी सुरू केली आहे. साडीच्या पेहेरावात आजवर काहीशी सीमित राहिलेली पैठणी फॅशनच्या बदलत्या दुनियेत युवती व युवकांना आकर्षित करण्यासाठी वेगळ्या रूपात दाखल होण्यास सज्ज झाली आहे. नवरदेवाचा पेहराव असो की युवक व युवतींसाठी विविध प्रकारचे कुर्ते, पैठणीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारची ‘अॅसेसरीज’ असे सर्व काही रेशमाच्या मुलायम धाग्याने विणलेले अन् पैठणीचा बाज राखणारे विविधांगी वस्त्र प्रावरणे प्रथमच बाजारात दाखल होत आहेत.
पैठणी अन् येवला तसे प्रदीर्घ काळापासून जुळलेले समीकरण. येवल्याची पैठणी देशातील नव्हे तर, परदेशातील महिलांनाही खुणावत असते. केळकर संग्रहालयात येवल्याची पैठणी हजारो वर्षांचा इतिहास अधोरेखित करते. प्रत्येक सण-समारंभात सर्वावर मोहिनी पाडणारी पैठणी हा तर जवळपास प्रत्येक महिलेसाठी जिव्हाळ्याचा विषय. घरातील प्रत्येक सोहळ्यासाठी महिला वर्गाकडून पैठणीला पहिली पसंती मिळते. पैठणी परिधान केलेली महिला अतिशय ठळकपणे नजरेत भरत असते. पैठणीची ही गुणवैशिष्टय़े लक्षात घेऊन येवल्यातील सुमन वसंत कोष्टी व सुमनबाई विधाते या ज्येष्ठ महिला कारागिरांनी तिची कक्षा रुंदावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महिला विणकरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येवल्यातील शाकंभरी हातमाग व हस्तकला संस्थेच्या पुढाकारातून या अनोख्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. महिला विणकरांनी निर्मिलेली विविधांगी वस्त्रप्रावरणे व वस्तूंसाठी येवल्यात खास विक्री केंद्र उभारण्याचा संस्थेचा मानस असल्याचे अध्यक्ष गणेश खळेकर यांनी सांगितले. हा पुढाकार घेताना आजच्या फॅशनच्या दुनियेतील नजाकत, त्याचा लहेजादेखील महिला विणकरांनी आत्मसात करून घेतला.
या दृष्टीने त्यांचे पहिले लक्ष्य होते, ते पुरुषांसाठी खास भरजरी वस्त्र प्रावरणे तयार करण्याचे. आजवर महिला वर्गापुरती मर्यादित असलेली पैठणीचे महावस्त्र आता नवऱ्या मुलांच्या पोशाखासाठी वापरण्यात येणार आहे. यासाठी धोती कुर्ता, जोधपुरी पद्धतीच्या पेहरावासह शेरवाणी, त्यावरील दुपट्टा, नवरदेवाचा फेटा रेशीम धाग्यात विणण्याचे काम सुरू झाले. वधूप्रमाणे नवरदेवालाही पैठणीसारख्या रेशीमच्या वस्त्र प्रावरणांचा साज हा साऱ्यांच्या औत्सुक्याचा विषय ठरेल. पैठणीने सजलेल्या नवरीप्रमाणे नवरदेवाचा रुबाब ही वस्त्र प्रावरणे निश्चितपणे वाढवतील, असा या महिला कारागिरांना विश्वास आहे. दुसरीकडे, बाजारपेठेतील बदलत्या प्रवाहात स्थान मिळविण्यासाठी महाविद्यालयीन युवतींसाठी नक्षीदार सजावटीचे वेगवेगळ्या कुर्ते तयार करण्यात येत आहे. त्यात जॅकेटसह, जॅकेटशिवाय, हैद्राबादी कलमकारीची नाजूक नक्षी असलेले कुर्ते तयार करण्यात आले आहेत. बच्चे कंपनीलाही कारागीर विसरलेले नाहीत. त्यांच्यासाठी खास परकर-पोलके, कुंची, नक्षीदार सजावटीचा फ्रॉक तयार करण्यात आला आहे.
दरम्यान, वस्त्रे प्रावरणे तयार झाल्यानंतर उरलेल्या काही रेशीम वस्त्र, धाग्यापासून या महिलांनी पैठणीला साजेशा अशा काही वस्तू तयार केल्या आहेत. यामध्ये रेशमी बांगडय़ा, दाराची शोभा वाढविणारे रेशमाच्या धाग्याने साकारलेले तोरण, भ्रमणध्वनी ठेवण्यासाठी त्यात मुलायम वस्त्रांनी तयार केलेली छोटेखानी पिशवी, रुखवतातील काही सामानही तयार करण्यात येत आहे. बाजारपेठेच्या मुख्य प्रवाहात उतरता यावे, ग्राहकांशी थेट संवाद व्हावा यासाठी संस्थेच्या वतीने येवला शहरात स्वतंत्र कलादालनाची निर्मिती करण्याचे ठरविले असून त्या अनुषंगाने कामही सुरू झाले आहे.
मोदींना ‘जॅकेट’ देण्याचा मानस
पैठणी तयार करणाऱ्या विणकरांपेक्षा ग्राहकांना विक्रेत्यांची भुरळ अधिक पडते. यामुळे कारागीर व ग्राहकांची नाळ कधीच जुळत नाही. यासाठी शाकंभरी हातमाग व हस्तकला संस्थेने पुढाकार घेतला असून यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. पैठणी विषयी सूचना, अभिप्राय, त्यातील बदल याबाबत ग्राहकांशी थेट संवाद साधता यावा, बदलत्या तंत्राशी जुळवून घेता यावे यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. तसेच, कारागीरांना बाजारपेठेच्या मुख्य प्रवाहात येणे आणि टिकून राहणे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कारागीर येवल्याची पैठणी नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मरणात राहावी यासाठी रेशीमच्या धाग्यापासून विणलेले खास मोदी ‘स्टाईल जॅकेट’ त्यांना पाठविण्याच्या तयारीत आहेत.