शिवजयंतीनिमित्त शहरात प्रतिमापूजन, पालखी मिरवणूक, मिरवणुका यांचे भरगच्च आयोजन करण्यात आले होते. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने छत्रपती शाहूमहाराज यांचे नातू यशराज युवराज यांनी शिवजयंती उत्सव सोहळय़ात भाग घेतला. मुस्लिम बांधवांच्या वतीनेही शिवजयंती साजरी करण्यात आली. सायंकाळी शिवाजी पेठ तरुण मंडळाची भव्य मिरवणूक वाजतगाजत निघाली होती. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांनी शिवरायांचा जीवनपट उलगडणारे मनोगत व्यक्त केले. उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांनी शिवरायांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित पोवाडा तर करवीरच्या तहसीलदाराने कविता सादर करून उपस्थितांची मनेजिंकली. पुरवठा अधिकारी संजय शिंदे, करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील, तहसीलदार शरद पाटील, नायब तहसीलदार सरस्वती पाटील आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. महापौर सुनीता राऊत यांनी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने टाऊन हॉलजवळील शिवाजी मंदिरात शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. तत्पूर्वी भवानी मंडप येथून अश्व, तोफ यांचा समावेश असलेली पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेचे पूजन व जन्मकाळावेळी पाळणापूजन युवराज मालोजीराजे यांचे चिरंजीव यशराज युवराज यांच्या हस्ते झाले. शाहीर आझाद नायकवडी यांनी पोवाडा सादर केला. ट्रस्टचे विश्वस्त बाबासाहेब यादव, अॅड. राजू चव्हाण यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
शिवाजी पेठ तरुण मंडळाच्या वतीने सायंकाळी शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. महापौर सुनीता राऊत, भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत सुरुवातीला अश्व, उंट होते. त्यामागे शिवचरित्रावर आधारित देखावे सादर करण्यात आले होते. टोलविरोधातील बॅनर लक्ष वेधून घेत होते. भगवे फेटे घातलेले नागरिक ढोल-ताशाच्या गजरात शिवरायांचा जयघोष करीत होते. मिरवणुकीतील शिवाजीमहाराजांची भव्य प्रतिमा लक्ष वेधून घेत होती. दरम्यान मुस्लिम समाजाच्या वतीनेही शिवजयंती साजरी करण्यात आली. हुतात्मा पार्क येथून निघालेल्या मिरवणुकीत मुस्लिम बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
इचलकरंजी येथील मराठा समाजाच्या वतीने साजरी केली जाणारी शिवजयंती उल्लेखनीय असते. येथे आज शिवजयंतीनिमित्त भजन, प्रवचन, जन्मकाळ सोहळा यांचे आयोजन केले होते. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उमेदवारांची उपस्थिती ठळकपणे जाणवत होती. शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेस माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, अशोक जांभळे आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मराठा मंडळाचे अध्यक्ष आनंदराव नेमिष्टे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. तर मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळय़ास नगराध्यक्षा सुमन पोवार, उपनगराध्यक्ष संजय कांबळे यांनी अभिवादन केले.
मनसेचा इंग्लिश शाळेला दणका
शिवजयंतीनिमित्त राज्य शासनाने शासकीय सुटी जाहीर केली असतानाही विबग्योर इंग्लिश मीडियम स्कूलचे कामकाज बुधवारी सुरू होते. मनसेचे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील, उमेश घोरपडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्राचार्य बागल यांना फैलावर घेतले. गतवर्षीही शिवजयंतीला शाळा सुरू ठेवल्याची आठवण करून देऊन मुजोर प्रशासन जाणीवपूर्वक शिवप्रेमींचा व राज्य शासनाचा अवमान करीत आहे असा आरोप केला. नाताळ सणाला दहा दिवस सुटी देणारे विबग्योरचे प्रशासन शिवजयंतीला शाळा का सुरू ठेवते, याचा खुलासा करण्याची मागणी केली. तसेच या शाळेचा परवाना रद्द करण्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला.
शिवजयंतीनिमित्त कोल्हापुरात प्रतिमापूजन, पालखी मिरवणूक
शिवजयंतीनिमित्त शहरात प्रतिमापूजन, पालखी मिरवणूक, मिरवणुका यांचे भरगच्च आयोजन करण्यात आले होते. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने छत्रपती शाहूमहाराज यांचे नातू यशराज युवराज यांनी शिवजयंती उत्सव सोहळय़ात भाग घेतला. मुस्लिम बांधवांच्या वतीनेही शिवजयंती साजरी करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-02-2014 at 03:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palanquin procession occasion of shivjayanti