पावसाची संततधार सुरू झाली की अनेक जणांच्या काळजात धडकी भरते. अतिवृष्टीचा अंदाज घेऊन शाळांना सुट्टी दिली जाते, अनेक जण घरातच राहणे पसंत करतात. मात्र वाडा तालुक्यातील पिंजाळ नदीकाठी पाली येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेले चारशे विद्यार्थी आणि पन्नास कर्मचारी मात्र पावसाची संततधार सुरू झाली की आश्रमशाळेतच राहून जीव मुठीत घेऊन रात्र काढतात.
अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंजाळ नदीने धोक्याची पातळी गाठली होती. मुसळधार पाऊस तीन दिवस सलग सुरू राहिल्याने तब्बल दोन दिवस रात्र जागून काढण्याची आफत येथील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांवर ओढवली होती. नदीपासून काही अंतरावरच असलेल्या या आश्रमशाळेतील काही कर्मचाऱ्यांनी धोक्याची रेषा आखून ठेवली आहे. या पूररेषेपर्यंत नदीचे पाणी आले की लगेचच विद्यार्थ्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करायचे हा नियमच येथील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी घालून दिला आहे. त्यामुळे या पूररेषेवर येथील कर्मचाऱ्यांना बारीक नजर ठेवावी लागते.
१९९८, २००२ आणि २०११ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या आठवणी सांगताना येथील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आजही धडकी भरते. २००२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये पिंजाळ नदीचे पाणी या आश्रमशाळेत शिरल्याने एकच हाहाकार उडला होता. वाडय़ाचे तहसीलदार विशे यांच्या तत्परतेमुळे आश्रमशाळेत अडकून पडलेल्या विद्यार्थी आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांना तात्काळ सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते.
या वेळी शाळेच्या इमारतीत दहा ते बारा फुटांपर्यंत पाणी शिरल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य आणि कपडे वाहून गेले होते. पिंजाळ नदीच्या किनाऱ्यापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या शासकीय आश्रमशाळेत पहिली ते दहावीचे चारशे विद्यार्थी शिक्षण घेत असून ही मुले जव्हार, विक्रमगड, वाडा तालुक्यांतील आदिवासी समाजातील आहेत. मुसळधार पाऊस सुरू झाला की या मुलांचे पालक शाळेकडे धाव घेतात.
अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसात पूरपरिस्थितीपर्यंत पाणी आलेच तर विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्याची व्यवस्था शाळेने केली होती. मात्र पाऊस ओसरल्याने येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
दरम्यान, येथे नेहमीच पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याने आश्रमशाळेचे स्थलांतर करण्यासाठी राज्य शासनाने पालीतच जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच नवीन जागेवर होणाऱ्या आश्रमशाळेच्या इमारतीसाठी आदिवासी विभागातून तीन कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र अद्याप या इमारतीचे काम सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे या इमारतीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी संतप्त पालक तसेच शाळेतील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
पाली आश्रमशाळा पूररेषेच्या छायेत जागा आणि निधी असूनही स्थलांतर नाही
पावसाची संततधार सुरू झाली की अनेक जणांच्या काळजात धडकी भरते. अतिवृष्टीचा अंदाज घेऊन शाळांना सुट्टी दिली जाते, अनेक जण घरातच राहणे पसंत करतात. मात्र वाडा तालुक्यातील पिंजाळ नदीकाठी पाली येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेले चारशे विद्यार्थी आणि पन्नास कर्मचारी मात्र पावसाची संततधार सुरू झाली की आश्रमशाळेतच राहून जीव मुठीत घेऊन रात्र काढतात.
First published on: 17-07-2013 at 08:54 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pali residential school comes in flood line