चिखलदरा नगर परिषदेच्या सदस्यपदाच्या १७ जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत नऊ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता हस्तगत केली आहे. काँग्रेसला ६ जागा, तर अपक्षांच्या वाटय़ाला दोन जागा आल्या. भाजप आणि शिवसेनेला एकही जागा मिळवता आली नाही. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक स्वतंत्ररीत्या लढवली होती.
चिखलदरा नगर परिषदेच्या ४ प्रभागांमधील १७ जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण ६२ उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व १७ जागांवर उमेदवार उभे केले होते. काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी १६ जागांवर शिवसेनेने ८ जागांवर उमेदवारांना संधी दिली होती. ५ जागांवर अपक्षांनी आपले भवितव्य अजमावले. १७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारडय़ात ९ जागा आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक १ बीडतलावमधून रेश्मा परवीन शेख मेहबूब (४६८ मते), सविता गावंडे (३८८), सुनीता लांजेवार (३६६), अरुण सपकाळ (३३४) आणि बद्रुन्निसा अख्तर हुसेन (३६४), प्रभाग क्रमांक ३ पालिका भवनमधून राजेंद्र सोमवंशी (४२३), कल्पना खडके (३६०), किरण घोडके (३२६) आणि प्रभाग क्रमांक ४ वनउद्यानमधून विजयी झालेल्या मीनल लिलाधर सिंगरूळ (१९३ मते) यांचा समावेश आहे.
काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक २ जवाहर वॉर्डमधून सुवर्णा चंद्राणी (५८४), नीता सोमवंशी (४२५), शैलेंद्र पाल (५४६) आणि रूपेश चौबे (५३८ मते), प्रभाग क्रमांक ३ पालिका भवनमधून राजेश मांगलेकर (३१२), तसेच प्रभाग क्रमांक ४ मधून सुनीता पवार (१६०) यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ४ मधून काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार अरुण किसन तायडे आणि अपक्ष प्रा. राजेश जयपूरकर निवडून आले आहेत. भाजप आणि शिवसेनेला या निवडणुकीत जोरदार फटका बसला आहे. या दोन्ही पक्षांना खातेही उघडता आलेले नाही. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सभेने निवडणुकीतील वातावरण तापवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, माजी आमदार सुलभा खोडके यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. काँग्रेसचे आमदार केवलराम काळे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी काँग्रेसची सूत्रे सांभाळली. शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी चिखलदरा येथे ठाण मांडूनही त्यांना पक्षाला यश मिळवून देता आले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा