आळंदी-देहू येथून आषाढी एकादशीचे सोहळ्यासाठी निघालेल्या सर्व संतांच्या पालख्यांनी ज्ञानोबा-तुकारामाचे जयघोषात पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला असून लक्षावधी नेत्र पंढरीकडे लागले असून एकादशी सोहळा अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. पंढरीत सुमारे दीड लाख वारकरी आहेत.
यात्रेच्या निमित्ताने छोटे व्यावसायिक, धार्मिक, पुस्तके, विविध वाद्ये, भडानी साहित्य तसेच पखवाज, मृदुंग, टाळ, चिपळ्या एकतारी, वीणा आदी दुकाने लागली असून प्रासादिक दुकानेही थाटली आहेत.
वारीत सर्वात महत्त्वाचे अन वारक ऱ्यांच्या जीवनात अपार आनंद देणारा क्षण हा चंद्रभागा स्नानाचा आहे. यासाठी नदीला धरणातून पाणी सोडल्याने वारकरी, भाविक स्नानाचा आनंद घेत आहेत.
यात्रेच्या निमित्ताने सर्वच खाद्य पदार्थाचे दर वाढलेले असून या खर्चामुळे वारकरी आखडता हात घेत आहेत. पंढरीत पाय ठेवताच वारक ऱ्यांचे भाविकांचे खिशाला कात्रीच असते. त्यामुळे वारकरी त्रस्त असतो. पंरतु सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी तो सर्व काही सहन करतो.
यंदा पावसाने सर्वत्र भरपूर हजेरी लावण्याने वारीत मोठय़ा प्रमाणात वारकरी असून सध्या पंढरीत जे भाविक दर्शनरांगेत उभे आहेत त्यातील १ मिनिटात ४० ते ५० भाविक दर्शन घेऊन बाहेर पडत आहेत ‘ऑनलाइन’ दर्शनासाठी १८ हजार लोकांनी बुकिंग केले आहे. समितीने पदस्पर्शदर्शन मुखदर्शन ‘ऑनलाइन’ दर्शन अशी सोय केली आहे. यंदा प्रथमच महत्त्वाचे रस्त्यावर हॉकर्स, फिरते विक्रेते यांना बंदी केल्याने स्टेशन रोड, शिवाजी चौक प्रदक्षिणामार्ग मोठा अन् वारक ऱ्यांनी गजबजलेला दिसत आहे.