प्रसिद्ध उद्योजक व भारत फोर्ज कंपनीचे संस्थापक निळकंठराव कल्याणी यांचे शनिवारी सांयकाळी वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी कोळे येथे हे वृत्त समजताच कोळे पंचक्रोशीवर शोककळा पसरली. ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. दिवसभर कोळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. कोळे पंचक्रोशीचा आधारवड हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत होती. ठिकठिकाणी निळकंठराव कल्याणी यांना श्रद्धांजली अर्पण करणारे फलक लावण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी कोळेसह परिसरातील ग्रामस्थ पुण्यास रवाना झाले.
कोळे (ता. कराड) हे कल्याणी यांचे मूळ गाव. त्यांचे वडील अण्णासाहेब कल्याणी सुरुवातीला कोळे व परिसरात शेतीव्यवसाय करत होते. लहानपणापासूनच समाजकार्याची आवड असणारे निळकंठराव कल्याणी पुढे पुण्यात स्थायिक झाले. कोळेसह परिसरात त्यांनी छोटे-मोठे उद्योग निर्माण केले. परिसरातील लोकांना त्यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध झाली. कोळे गावात पिण्याच्या पाण्याची नळपाणी योजना त्यांनी पहिल्यांदा राबवली. भारत निर्माणमधून नुकत्याच राबविण्यात आलेल्या नळपाणी योजनेच्या लोकवर्गणीतही त्यांचे मोलाचे योगदान होते. कोळेतील मुख्य बाजारपेठेत त्यांचे जुने घर आहे. अधूनमधून ते मूळ गावी येत असत. पुण्यात त्यांचे निधन झाल्याची बातमी समजताच कोळे व पंचक्रोशीवर शोककळा पसरली. केशवनगर (पुणे) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याने कोळेसह परिसरातील अनेक ग्रामस्थ पुण्याला रवाना झाले आहेत.

Story img Loader