पनवेल तालुक्यात लहान-मोठय़ा धरणांमधील पाणी, नियोजन नसल्याने वाया जात आहे, आजही तळोजासारख्या वसाहतीमधील रहिवाशांना दिवसभरात अर्धा तास पाणीपुरवठा सिडकोकडून होतो. यावर मात करण्यासाठी सिडकोने पनवेल तालुक्यामधील धरणांचा विकास करून या पाण्यापासून रहिवाशांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनींनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्याकडे केली आहे.खारघर, तळोजा आणि कामोठे या तीन वसाहतींमधील रहिवासी यंदा पाणी संकटाला तोंड देत आहेत. पनवेल तालुक्यामधील ग्रामीण परिसर व शहरी परिसराला एकूण २७५ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे. सिडकोचा नैना प्रकल्प घोषित झाल्यापासून मोठय़ा प्रमाणात तालुक्यामधील ग्रामीण परिसरामधील इमारतींची बांधकामे थांबली. मात्र आजही नेरे, आकुर्ली परिसरांत इमारतींमधील रहिवाशांना अशुद्ध पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. हे रहिवासी धुणीभांडी, आंघोळ व कपडे धुण्यासाठी बोअरवेलचे पाणी वापरतात, तर पिण्यासाठी बिसलेरीचे कॅन विकत घरी आणून आपली तहान भागवतात. नगर परिषदेच्या हद्दीतील रहिवाशांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तर सिडकोच्या हद्दीत सकाळी व सायंकाळी अर्धा तास पाणीपुरवठा होतो. एकीकडे पाण्याची आणीबाणी असताना भविष्यात किती पाणी लागणार याची आकडेवारी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे नाही. त्याचे लेखापरीक्षणही झालेले नाही. पाण्याची समस्या भेडसावत असतानाही रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी पळस्पे येथे १५ हजार लोकवस्तीचा साईवर्ल्ड सिटी गृहप्रकल्पाचे उद्घाटन करून पनवेलच्या एकूण लोकवस्तीमध्ये वाढ केली आहे. इमारतींच्या विकासासोबत भविष्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्री झटताना दिसत नाहीत.सिडकोने पाण्यासाठी बाळगंगा धरणाच्या अर्धवट कामावर अवलंबून न राहता तालुक्यातील वाजापूर, धामणी, मोरबा आणि ओवा व इतर लहान धरणांपासून वसाहतींमधील रहिवाशांची तहान भागवावी, अशी मागणी तळोजा परिसरातील पनवेल पंचायत समितीचे सदस्य हरेश केणी यांनी लेखी स्वरूपात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्याकडे केली आहे. या धरणांपैकी काही धरणांची जबाबदारी जिल्हा परिषद व पाटबंधारे विभागाकडे आहे.  कर्जत येथील कोंढाणे धरण विकत घेण्याचा घाट

पनवेलच्या पाणीटंचाईवर उत्तर म्हणून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी कर्जत येथील कोंढाणे धरण सिडको घेणार असल्याची घोषणा केली. परंतु सिडकोचे भाटिया यांचे हे विधान पाण्यावरची वेळ मारणारे ठरले आहे. सिडकोने हे धरण विकत घेण्याचा प्रस्ताव कोकण पाटबंधारे विभागाला दिला आहे. त्यावर प्रशासनदरबारी अजूनही कोणतीही हालचाल झालेली नाही. भाटिया यांच्या विधानावर पनवेलच्या लोकप्रतिनिधींनी भाटिया यांनाच लेखी अन्य प्रस्ताव सुचवले आहेत.  नियोजनअभावी सध्या पनवेलच्या या धरणांतील पाणी वाया जात आहे. ३० किलोमीटर अंतरावरून पाण्याची सोय करण्यापेक्षा सिडकोने तालुक्यातील जवळच्याचार पडीक धरणांचा विकास केल्यास पाण्याचा प्रश्न तातडीने सुटेल, असे लेखी पत्रच पनवेल पंचायत समितीचे सदस्य हरेश केणी यांनी भाटिया यांना दिले आहे.

 

Story img Loader