रेणुका शुगर्स संचलित पंचगंगा साखर कारखान्याने गत हंगामातील दुसरा हप्ता शेतक-यांना न दिल्याच्या निषेधार्थ कारखान्याच्या इचलकरंजी, कुरुंदवाड, पट्टणकोडोली, जयसिंगपूर या ठिकाणच्या कार्यालयांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोकले. रेणुका शुगर्सने पंचगंगा साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास घेतला आहे. गतहंगामातील उसाला रेणुकाने पहिला हप्ता दिला आहे. अन्य कारखान्यांनी दिवाळीपूर्वी दुसरा हप्ता दिला असला तरी रेणुकाकडून मात्र हात वर करण्यात आले होते. दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी द्यावा, या मागणीचे निवेदन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रेणुकाच्या व्यवस्थापनाला दिले होते. त्याकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलन करण्यात आले.    
इचलकरंजीतील कारखाना कार्यस्थळी गेलेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शेती कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांना बाहेर काढून टाळे ठोकले. रेणुका व्यवस्थापनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. साडेतीन तास आंदोलन करूनही व्यवस्थापनाची हालचाल न दिसल्याने कार्यालयाला ठोकलेले टाळे तसेच ठेवून कार्यकर्ते निघून गेले. जयसिंगपूर येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रेणुकाच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. जयसिंगपूर, पट्टणकोडोली, कुरुंदवाड येथील विभागीय कार्यालयांनाही टाळे ठोकून शेतक-यांनी संताप व्यक्त केले. या आंदोलनाचे नेतृत्व जयकुमार कोले, नागेश पुजारी, अण्णासाहेब चौगुले, आदिनाथ हेमगिरे, विठ्ठल मोरे, के. आर. चव्हाण, सागर शंभुशेठे, रमेश भोजकर, रमाकांत जोशी आदींनी केले.

Story img Loader