पंढरपूर शहर तालुक्याचा आर्थिक कणा असलेल्या पंढरपूर अर्बन को. ऑप. बँकेने शताब्दी पूर्ण केली असून बँकेच्या नवी पेठ येथील नूतनीकरण केलेल्या इमारतीचे अन् वर्षभर विविध उपक्रम राबवलेल्या कार्यक्रमाचा समारोप २९ डिसेंबर रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे हस्ते होत आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्याची जय्यत तयारी पूर्ण होत आली असून दुपारी ३ वाजता पंढरीत राष्ट्रपती येत आहेत. त्यांचे मार्गदर्शनपर भाषण कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारात होत आहे. तेथे व्यासपीठाची तयारी करण्यात आली आहे.
अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी शताब्दी वर्षांच्या निमित्ताने सहकाराबरोबरच सामाजिक उपक्रम राबवले. छोटय़ा छोटय़ा व्यावसायिकांना व्यवसाय करता यावे, या करता १ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिली. सुशिक्षित बेकार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, मुलाखतीस सामोरे कसे जावे या करता फेअर जॉबचे आयोजन केले होते.
रक्तदान शिबिर, आरोग्य, तसेच मोफत शस्त्रक्रिया शिबिरासारखे उपक्रम राबवले, सभासद नागरिक यांना भक्तिसंगीत तसेच अजय अतुल यांच्या संगीत रजनीचा ५० ते ६० हजार जणांनी आनंद घेतला.
वर्षभर राबवलेल्या या समाजउपयोगी कार्यक्रमाची अन् बँकेने शताब्दी पूर्ण करून वेगळा ठसा उमटवलेल्या कार्यक्रमाच्या सांगता समारंभास राष्ट्रपती येत आहेत हे सर्वाचे दृष्टीने भाग्य आहे, असे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी सांगितले. राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्ताने जय्यत तयारी झाली असून खबरदारीचे उपाय म्हणून लॉज,धर्मशाळा यांची तपासणी चालू आहे.