भारतीय शास्त्रीय संगीत, नाटय़ संगीत, कथ्थक, कर्नाटकी गायन, शहनाईवादन, सतारवादन अशा विविध रंगांनी रंगलेल्या २० व्या पं. राम मराठे स्मृती महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी पं. राम मराठे स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ठाण्यातील प्रख्यात सतारवादक मारुती पाटील आणि डोंबिवलीचे ज्येष्ठ तबलावादक सदाशिव पवार यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. सतारवादक रवींद्र चारी आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी या सोहळ्याला आपल्या अलौकिक कलेने चारचाँद लावले.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद ठाणे शाखा आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गडकरी रंगायतनमध्ये आयोजित पं. राम मराठे स्मृती महोत्सवने गेले पाच दिवस रसिकांना समृद्ध संगीताची अनुभूती दिली. या महोत्सवाचा समारोप रविवारी करण्यात आला. या प्रसंगी गेल्या तीन वर्षांपासून पं. राम मराठे यांच्या स्मरणार्थ कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना दिला जाणारा पुरस्कार वितरित करण्यात आला. यंदा या पुरस्काराचे मानकरी असलेल्या सतारवादक मारुती पाटील आणि तबलावादक सदाशिव पवार यांना महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी हा पुरस्कार प्रदान केला. सतारवादक मारुती पाटील यांना ११ हजार रोख आणि स्मृती चषक, तर सदाशिव पवार यांना २५ हजार रोख आणि स्मृतिचषक देण्यात आले. या वेळी मराठी नाटय़ परिषद ठाण्याचे अध्यक्ष आ. राजन विचारे आणि महापालिका पदाधिकारी उपस्थित होते.
पुरस्काराचे मानकरी मारुती पाटील यांनी यंदाचा पुरस्कार सतार आणि तबलावादकांना दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला, तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाणेकर रसिकांनी भारतीय संगीताला दिलेली पसंती लक्षवेधक अशीच असल्याचे मान्यवरांनी कबूल केले. कार्यक्रमाचा समारोप सतारवादक रवींद्र चारी यांनी आपल्या सतारवादनाने आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनाने झाला. रवींद्र चारी यांनी बागेश्री रागावर आधारित सतारवादन केले. त्यांना सत्यजीत तळवलकर यांनी साथ दिली. रविवारच्या दुपारच्या सत्रामध्ये दिवंगत ज्योत्स्ना भोळे यांच्या जन्मशताब्दीवर्षांनिमित्त ‘संगीत कुलवधू’ या नाटकाचा आस्वाद ठाणेकर रसिकांना घेता आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा