दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हेम केशवदत्त मिश्रा याच्यासह पोलिसांनी २२ ऑगस्टला अहेरीत अटक केलेले एटापल्ली तालुक्यातील मोरेवाडा येथील पांडू पोरा नरोटे (२७) आणि महेश करमंद तिरकी (२४) हे युवक नक्षलवाद्यांचे समर्थक नसून ते निर्दोष असल्याचे या दोघांच्याही वडिलांनी येथील पत्रकार भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
पांडूचे वडील पोरा बच्चा नरोटी आणि महेशचे वडील करीमन संतराम तिरकी म्हणाले की, आमचे गाव मोरेवाडा एटापल्ली तालुका मुख्यालयापासून ५४ कि.मी. अंतरावर छत्तीसगडच्या सीमेवर आहे. या परिसरात नक्षलवाद्यांचा प्रभाव असल्याने त्यांच्या भीतीपोटी त्यांनी सांगितलेली कामे मुकाटय़ाने करावी लागतात. अन्यथा, ते बेदम मारझोड करतात किंवा ठार तरी मारतात. त्यांच्यासमोर बोलायला कुणीही पुढे येत नाहीत. नक्षलवाद्यांनी पांडू आणि महेशला कुणीतरी पाहुणा येत आहे, असे सांगून त्याला घ्यायला अहेरी येथे पाठवले. येणारा पाहुणा कोण आहे, हे या दोघांनाही माहीत नव्हते. नक्षलवाद्यांच्या धाकापोटी ते अहेरीला गेले असता पोलिसांनी या दोघांनाही अहेरी बसस्थानकावर २२ ऑगस्टला अटक करून १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. त्यांच्या अटकेनंतर तीन दिवसांनी पोलिसांनी कुटुंबीयांना माहिती दिली. २७ ऑगस्टला पांडू आणि महेशचे वडील अहेरी पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना ठाणेदाराने भेटू दिले नाही.
नक्षलवाद्यांच्या दबावापोटी ते अहेरी येथे गेल्याने ते नक्षलसमर्थक कसे ठरतात, असाही प्रश्न दोघांच्या वडिलांनी उपस्थित केला. २०११ मध्ये नक्षलवाद्यांनी त्यांचे काम न केल्याने पांडू नरोटेला मारहाण केली होती. त्यावेळी त्याने या जाचाला कंटाळून विष प्राशन केले होते. आम्हा कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यास प्रथम गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर एटापल्लीला हलवले. प्रकृती गंभीर असल्याने तेथे पोटातून विष काढल्यानंतर अहेरीला हलवले. अहेरी येथून गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आठ ते दहा दिवस उपचार केल्यानंतर पांडू दुरुस्त झाला, अशी माहिती पांडूच्या वडिलांनी दिली. त्यामुळे माझा मुलगा पांडू नक्षलसमर्थक कसा ठरू शकतो, असा सवाल करून दोन्ही मुलांनी नक्षलवाद्यांच्या धाकापोटी त्यांनी सांगितलेले काम केले, पण ते निर्दोष असल्याने त्यांची सुटका करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
आठ महिन्यांपूर्वी परिसरातील सुमित्रा वड्डे हिने नक्षलवाद्यांची चळवळ सोडली. परंतु, पोलिसांनी तिला पकडून आणून १५ ऑगस्टला पालकमंत्र्यांसमोर आत्मसमर्पित नक्षलवादी म्हणून हजर केले, अशीही माहिती त्यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा