जंगलात काडय़ा वेचण्यासाठी गेलेल्या महिलेची शिकार करणाऱ्या नरभक्षक बिबटय़ाला जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले. सावली वनपरिक्षेत्रातील पालेबारसाअंतर्गत येणाऱ्या उसरपार चक येथील महिला अनुसया लक्ष्मण शेंडे (५५) ही काडय़ा वेचण्यासाठी दुपारी बारा वाजता जंगलात गेली. सायंकाळ झाली तरी परत आली नाही म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता जंगलाच्या मार्गावर तिचे कपडे, विळा, चप्पल व रक्त जमिनीवर पडलेले दिसले. काही दूर अंतर जात नाही तोच अनुसयाचा मृतदेह दिसला. बिबटय़ाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याचे बघून गावकरी चांगलेच भडकले. वनाधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करतांना बिबटय़ाला ताबडतोब जेरबंद करण्याची मागणी केली. बिबट जेरबंद होणार नाही तोवर मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेताच रात्री ११ वाजता पिंजरा लावण्यात आला.
बिबटय़ाला आमिष देण्यासाठी म्हणून पिंजऱ्यात बोकड ठेवण्यात आले. पिंजरा ठेवून अर्धा तास होत नाही तोच बिबटय़ा जेरबंद झाला. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी बी.सी.पत्तीवार, वनपाल बी.के.तुपे बिबटय़ाला राजोली येथे घेऊन गेले. दुसरीकडे अनुसयाचा मृतदेह घरी आणण्यात आला. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी मृताच्या कुटुंबीयांना दहा हजाराची तात्काळ मदत देण्यात आली. यानंतर थोडय़ाच वेळाने जेरबंद बिबटय़ाला ताडोबाच्या जंगलात सोडण्यात आले.

Story img Loader